घनःश्याम कडू
उरण : उरण परिसरात नशेच्या पानाची क्रेझ सुरु आहे. पानपट्ट्यांवर दारूच्या बाटल्यांएवढी नशा येणार्या पानांची विक्री खुलेआम होताना दिसत आहे. उरण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर ड्रग पेडलर्सचे जाळे पसरलेले आहे. यामुळे गावांमध्ये नशेचा एक अजब प्रकार पाहायला मिळत आहे.
उरणमध्ये ’नशायुक्त पान’! हे पानाची तरुणांमध्ये खूप मोठी क्रेझ आहे. या पानामध्ये अनेक दारूच्या बाटल्या पिल्यानंतर जेवढी नशा येते तितकी नशा एक पान खाल्ल्यानंतर येते, असे हे पान खाणारे सांगतात. या पानामध्ये किमाम नावाची तंबाखू मोठ्या प्रमाणात वापरली जाते. हे नशायुक्त पान कधीही न खाणार्या व्यक्तीने खाल्ले तर त्याला लगेच चक्कर येऊन खाणारी व्यक्ती बेशुद्ध पडते असे अनेक प्रकरणांमध्ये दिसून आले आहे. उरण परिसरात तसेच अनेक गावांमध्ये असे नशायुक्त पान खाण्याचे एक व्यसनच तरुणांमध्ये दिसून येत आहे. पानपट्ट्यांवर दिवसाढवळ्या या तरुणांचा घोळका हमखास दिसून येतो. रात्रीच्या वेळेस या तरुणांमध्ये पान खाण्याची एक स्पर्धाच लागलेली दिसून येत आहे.
उरण शहर, तालुक्यात व जेएनपीटी परिसरातील सर्वच पान टपरीवर या नशायुक्त पानाचे सेवन करणे हे मोठे फॅड आले आहे. एका पानाची रक्कम 30 ते 100 रुपये आहे. या पानामध्ये फुलचंद, पंचरत्न, नवरत्न व 120, 300 बनारस व कलकत्ता पानांचा समावेश आहे. या पानांमध्ये सुगंधित तंबाखू, सुपारी, कात, चुना, रिमझिम व एक अनोळखी नशेली पदार्थ टाकला जातो आणि याच पानाचा विडा खाण्यासाठी तरुण व तरुणींमध्ये पैशांच्या पैजा लागल्या जात आहेत. गुटख्यापासून त्या नशेच्या अनेक प्रकारच्या मादक पदार्थांच्या विक्रीसाठी आता राजरोसपणाने मार्केटिंग होऊ लागले आहे. त्यापैकी एक मार्केट आता खाण्याच्या पानांमधून समोर आल्याने ही वाढती चिंता पालक वर्गासाठी असेल.
या पानामध्ये वर सांगितले गेलेले प्रकार जरी अनेकांनी या पूर्वी ऐकले असतील तरी देखील यामध्ये एक विशिष्ट प्रकारची पावडर टाकली जाते. या पावडरनुसार ऑर्डरप्रमाणे पान कडक करायचे की साधे हे ठरवले जाते. या पावडरबद्दल पान विक्रेते बरीच गुप्तता पाळून असतात. ही पावडर कशाची आहे याबद्दल माहिती दिली जात नाही. परंतु खाणारे पानाचे शौकिन सांगतात की, या पावडरमध्ये नशेची जादू लपलेली आहे. पानामध्ये सुपारी, त्याबरोबरच तंबाखू तिच्या विविध प्रकारांमध्ये नशा करण्यासाठी वापरली जाते. त्यातून मोठ्या प्रमाणावर तोंडाचा कॅन्सर होण्याची संभावना असते. हळूहळू तोंडाचा आकार देखील लहान होत जातो. तोंडातील त्वचा नाजूक असते. तंबाखूमुळे तोंडामध्ये गाठी तयार होत असल्याची धक्कादायक माहिती डॉक्टरांनी दिली आहे. तरी नशायुक्त पान खाणाऱ्यांनी सावध होऊन या व्यसनापासून दूर व्हावे.
