• प्रशासनाचा समन्वयाचा अभाव तर विरोधकांपुढे गावकरी हतबल
• बसस्थानकाच्या मोकळ्या भूखंडावर अनेकांचा डोळा
संजय प्रभाळे
बोर्लीपंचतन : श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन ही एकमेव मोठी बाजारपेठ व याच परिसराला पर्यटनाचा दर्जा प्राप्त असलेल्या शहरात अद्यापही बसस्थानक नाही. दोन वर्ष प्रशासनाकडे मागणी होत असताना ठोस निर्णय नाही. त्यामुळे अजून किती वर्ष उन्हाळे पावसाळे झेलत प्रवाशांनी रस्त्यावर ताटकळत उभे राहायचे असा संतप्त सवाल पंचक्रोशीतील जनमानसातून केलं जातं आहे.
मागील दोन वर्षापासून असलेली बसस्थानकाची मागणी अजुनपर्यंत पूर्ण झाली नाही. यासाठी प्रशासनाने सकारात्मकता दाखवली नाही. शेवटी ग्रामस्थांकडून पाठपुरावा करण्यात आला. मात्र, चार चौघांच्या विरोधापुढे प्रशासन देखील हतबल झाल्याने कोणताच ठोस निर्णय झाला नाही. त्यामुळे आणखी बसस्थानकासाठी किती दिवस प्रतीक्षा करायची, असा प्रश्न येथील नागरिक तथा प्रवाशी करीत आहे.
बसस्थानकासाठी मोकळा भूखंड असून देखील दोन वर्षामध्ये येथे निवाराशेड उभारणीसाठी प्रशासनाकडून कोणतीच तयारी केली नाही. त्यामुळे गावकऱ्यांनी गावाला सुसज्ज बसस्थानक मिळावे यासाठी लोकवर्गणीतून बसस्थानक बांधण्याची तयारी दर्शवली. मात्र, त्याला ही कडाडून विरोध झाला. सद्या बोर्लीपंचतनच्या जूना एसटी थांबा परीसरात असलेल्या एकमेव मोकळ्या भूखंडावर आता अतिक्रमणाचा विळखा पडत आहे. यामध्ये फक्त रोजंदारी करणारे नव्हे, तर आता सगळ्यांचाच डोळा आहे.
शहराच्या वाढत्या महत्वानुसार येथे एवढ्या कालावधीत मोठे बसस्थानक होणे आवश्यक होते. मात्र, लोकप्रतिनिधींच्या अनास्थेमुळे ते होऊ शकले नाही. परिणामी प्रवाशांना मागील दोन वर्षांपासून त्रास सहन करीत बसची वाट बघावी लागते. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून बसस्थानकासाठी लागणाऱ्या भूखंड प्रक्रियेला मान्यता आहे. मात्र, परिवहन महामंडळाने निवारा शेड होण्यासाठी तत्परता दाखवली नाही. प्रशासनाने समन्वय साधावा, तरच बसस्थानक होईल अशी अपेक्षा गावकऱ्यांना आहे.
महिला प्रवाशांची कुचंबणा बोर्लीपंचतन येथे मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी पाहायला मिळते. मात्र, येथे बसस्थानकच नाही तर स्वच्छतागृह येणार कुठून, असे विदारक वास्तव असून लोकांची विशेषत: महिलांची कुचंबणा होत आहे. |