आनंद मनवर
पाली : टाटा कॅपिटल लिमिटेड, सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ ठाणे यांच्या मार्फत दि. 25/11/2025 रोजी विविध शालेय स्पर्धेचे उदघाटन अध्यक्ष विठ्ठल घाडगे, उपाध्यक्ष वसंत लहाने, समन्वयक बळीराम निंबाळकर, पत्रकार श्री. दळवी यांच्या उपस्थितीत शारदा विद्यालाय पेडली, ता. सुधागड येथे करण्यात आले. या वेळी समन्वयक बळीराम निंबाळकर यांनी गेली 5 ते 6 वर्ष आपल्या मराठा सेवा संघांनी केलेल्या कामाचा आढावा घेतला.

आजपर्यंत टाटा कॅपिटल यांच्या सहभागातून दीड कोटी रुपयांचा निधी सुधागडमधील सर्व माध्यमिक शाळांकरीता विविध शैक्षणिक कामाकरिता उपलब्ध करुन दिला आहे. त्यामध्ये सुधागडमधील सर्व माध्यमिक शाळेत विध्यार्थ्यांना आत्याधुनिक सोयीचे स्वच्छता गृह, मुला-मुलींकरीता स्वतंत्र शौचालय बांधण्यात आली, प्रत्येक शाळेला क्रीडा साहित्याचे वाटप करण्यात आले, ई-लर्निंग साहित्य, वाचन कट्टे, शाळेचे वाचनालय सुसज्ज आणि अभ्यासू असण्यासाठी ग्रंथालयाला विविध पुस्तकांचे संच पुरविण्यात आले, त्यामुळे प्रत्येक शाळेत पुस्तकांची विपुलता झाली. गोरगरजू, अपंग, अनाथ विद्यार्थ्यांचे शिक्षण सुटू नये यासाठी भरीव आर्थिक मदत दरवर्षी मोठ्या प्रमाणात दिली जाते. इयत्ता 5 वी, 8 वीला शिष्यवृत्ती परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा फी त्या बरोबर एसएससी परीक्षेला आदिवासी एसटी संवर्गातील मुलामुलींचे बोर्ड परीक्षा फी टाटा कॅपिटल यांचा सहयोगाने भरली जाते. अशी अनेक शैक्षणिक, सामाजिक कार्य करुन समाजातील आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थी घडवण्याचे कार्य सुधागड तालुका सेवा संघाच्यावतीने करण्यात येत असल्याची माहिती निंबाळकर यांनी दिली.
पहिल्या दिवशी पेडली येथे विद्यार्थ्यांकरीता वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा मजरे, जांभूळपाडा, चित्रकला स्पर्धा आत्मोन्नती जांभूळपाडा, प्रश्नमंजुषा बल्लाळ विनायक तसेच क्रीडा स्पर्धेचे आयोजन ग. बा. वडेर पाली येथे करण्यात आले. सदर कार्यक्रमाला सुधागड तालुक्यातील सर्व माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षिका, सेवक वर्ग, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तांडेल सर यांनी केले. तर सर्व मान्यवरांचे स्वागत शारदा विद्या मंदीर पेडलीचे मुख्याध्यापक अवताडे सर, सुपरवायझर प्रदीप गोळे तसेच संस्था समन्वयक मंदाकिनी मॅडम यांनी केले. सुधागड रहिवासी सेवा संघाचे शाळा समन्वयक नरेश शेडगे, जगताप सर, मिलिंद शिंदे, सुधीर शिंदे यांनी कार्यक्रम यशस्वी होण्याकरीता अपार मेहनत घेतली.
