पित्यानेच केले स्वतःच्या मुलीवर लैंगिक अत्याचार; महाड एमआयडीसी हद्दीतील घटना
पॉक्सोअंतर्गत महाड एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
अमुलकुमार जैन
रायगड : मुलगी आणि वडिलांचे नाते खूप महत्त्वाचे मानले जाते. असे म्हणतात. वडिलांना लाडक्या मुली असतात. पण जेव्हा नराधम बापच आपल्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करू लागतो आणि त्यांना चुकीच्या गोष्टी करायला भाग पाडतो तेव्हा त्यांना काय म्हणणार? रायगड जिल्ह्यातील महाड एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत असाच एक प्रकार समोर आला आहे. पीडित मुलगी हिने आपल्याच बापाविरुद्ध महाड एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी अत्याचारी बापास जेरबंद केले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, महाड एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत एक परप्रांतीय कुटुंब राहत आहे. पीडित मुलगी ही अल्पवयीन असल्यापासून म्हणजे सन 2017 पासून नराधम बापाची वासनांध वृत्ती जागी झाल्याने मागचा पुढचा कोणताही विचार न करता आपल्याच पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करू लागला होता. पीडित मुलगी ही वडीलांसोबत घरीच राहत होती. स्वतःची मुलगी ही अल्पवयीन असल्याचे वडिलांना माहिती असून देखील तिच्यावर वेळोवेळी लैंगिक अत्याचार केले. आपली बदनामी होईल या भीतीपोटी 2017 पासून वारंवार होत असलेले लैंगिक अत्याचार ती सहन करीत होती. वारंवार होत असलेले लैंगिक अत्याचार सहन न झाल्यामुळे पीडित मुलीने अखेर पोलीस ठाणे गाठलं. आणि स्वतःच्या बापा विरोधात महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. बापाने केलेल्या या धक्कादायक कृत्यामुळे संपूर्ण परिसरामध्ये खळबळ माजली आहे. महाड एमआयडीसी पोलिसांनी पीडित मुलीच्या बापाला अटक केली असून त्याच्या विरोधात पॉक्सो कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महाड उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे व महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समेळ सुर्वे या संपूर्ण गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.
