• Sun. Jun 22nd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

अलिबागमध्ये शुक्रवारी सहकार दिंडीचे आयोजन

ByEditor

Jan 28, 2025

प्रतिनिधी
अलिबाग :
युनोने २०२५ हे वर्ष आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष जाहीर केले आहे. त्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या कार्यक्रमांचा भाग म्हणून राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये सहकार दिंडी चे आयोजन करण्यात येणार आहे. रायगड जिल्हयात अलिबाग येथे शुक्रवारी (दि. ३१) सहकार दिंडी काढण्यात येणार आहे. या दिंडीमध्ये सर्व सहकारी संस्था सहभागी होणार आहेत.

२०२५ हे आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून जाहीर करण्यात आले आहे. त्यानिमित्त राज्यातून मुंबई व नागपूर येथून सहकार दिंडी निघणार आहे. ३० जानेवारी रोजी मुंबई येथून सहकार महर्षी धनंजयराव गाडगीळ यांच्या नावाची दिंडी निघणार आहे. अलिबागमध्ये ३० जानेवारी रोजी सायंकाळी सह‌कार दिंडीचे आगमन होईल. ३१ जानेवारी रोजी सकाळी १०.०० वाजता अलिबाग मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून दिंडीची सुरूवात होईल. महावीर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, ठिकरुळनाका, रायगड बाजार या मार्गाने ही दिंडी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्यालयात पोहचेल. तेथे सांगता समारंभ होईल. त्यानंतर ही दिंडी महाड कडे रवाना होईल. सहकार विभागाचे अधिकारी, कर्मचारी, रायगड जिल्हा मध्यवर्ती सह‌कारी बँकेचे पदाधिकारी, अधिकारी कर्मचारी, रायगड जिल्हा पतसंस्थांचा महासंघाचे पदाधिकारी, जिल्हयातील सर्व सहकारी पतसंस्थाचे संचालक, अधिकारी, कर्मचारी या सहकार दिंडीमध्ये सहभागी होणार आहेत.

महाराष्ट्र राज्य पतसंस्थांचा महासंघाचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे, रायगड जिल्हा मध्यवर्ती सह‌कारी बँकेचे उपाध्यक्ष सुरेश खैरे, रायगड जिल्हा पतसंस्थांचा महासंघाचे अध्यक्ष ॲड. जे .टी. पाटील, रायगड जिल्हा सहकारी संस्था उपनिबंधक प्रमोद जगताप, सहाय्यक निबंधक श्रीकांत पाटील, रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक, महाराष्ट्र राज्य पतसंस्थांच्या महासंघाचे उप कार्याध्यक्ष सुरेश पाटील, कोकण विभाग पतसंस्था महासंघाचे अध्यक्ष गिरीश तुळपुळे आदी सहकार क्षेत्रातील मान्यवर या सहकार दिंडीत सहभागी होणार आहेत. रायगड जिल्ह्यातील सर्व सहकारी संस्थांनी या सहकार दिंडीत सहभागी व्हावे असे आवाहन रायगड जिल्हा उपनिबंधक प्रमोद जगताप, महाराष्ट्र राज्य पतसंस्थांच्या महासंघाचे उप कार्याध्यक्ष सुरेश पाटील यांनी केले आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!