मिलिंद माने
महाड : महाड औद्योगिक वसाहतीमधील लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीमध्ये दुपारच्या सुमारास बॉयलर टँकचा स्फोट होऊन झालेल्या अपघातात एक कामगार जखमी झाला असून त्याला बिरवाडी येथील सोहम हॉस्पिटल या खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
महाड औद्योगिक वसाहतीमधील लक्ष्मी ऑर्गानिक कंपनीमध्ये वारंवार अपघाताची मालिका चालू असतानाच आज दुपारच्या सुमारास कंपनीमधील काम करणारा प्रणित दीपक जाधव (रा. सांडोशी, ता. महाड) येथील तरुण कामगार भाजल्याने जखमी झाला असून त्याला बिरवाडीमधील डॉ. आनंद जोगदंड यांच्या सोहम हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
लक्ष्मी ऑर्गानिक कंपनीत काम करणारा प्रणित दीपक जाधव हा कंपनीत काम करीत असताना बॉयलर टॅंकजवळ स्पार्क झाल्याने अपघात झाल्याची प्राथमिक माहिती प्राप्त होत असून या कामगाराला पोटाला व हाताला तसेच चेहऱ्याला गंभीर जखमा झाल्या आहेत. लक्ष्मी ऑर्गानिक कंपनी व्यवस्थापनाने प्रणित दीपक जाधव या कामगाराला खाजगी रुग्णालयात दाखल करून आपले सोपस्कार पार पाडले असले तरी कंपनीच्या कामगारांची सुरक्षा पाहणारे फॅक्टरी इन्स्पेक्टर या घटनेला जबाबदार असून कामगारांच्या जीविताशी खेळण्याचे प्रकार कंपनी व्यवस्थापनाच्या माध्यमातून चालू असल्याचे उघड झाले आहे.
लक्ष्मी ऑर्गानिक कंपनीत आज झालेल्या प्रकारामुळे एक कामगार जखमी झाला असताना देखील याबाबतची कोणत्याही स्वरूपाची नोंद महाड औद्योगिक वसाहतीमधील पोलीस ठाण्यात करण्यात आलेली नाही. यामुळे संबंधित कंपनी व अन्य कंपन्या असे प्रकार दाबण्याचा वारंवार प्रकार करीत असल्याचे या निमित्ताने उघड झाले आहे.