घन:श्याम कडू
उरण : उरणमधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील अनेक पदाधिकारी हे सत्ताधारी शिंदे गटाच्या मंत्र्यांच्या संपर्कात आहेत. यामुळे निष्ठावंत ठाकरे गटाच्या शिवसैनिकांत कमालीची अस्वस्थता आहे.
उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील अनेक मातब्बर नेतेमंडळी पक्ष सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत पक्षप्रवेश करीत आहेत. मात्र उरणमधील तालुका पातळीवरील अनेक पदाधिकारी हे शिंदे गटाच्या मंत्री व खासदार यांच्या सातत्याने संपर्कात असल्याचे अधिकृत सूत्रांकडून समजते. काही पदाधिकारी तर नागपूर येथील अधिवेशनात मंत्री महोदयांच्या पाठीपाठी फिरत होते. तर काही पदाधिकारी हे खासदारांच्या संपर्कात आहेत. मात्र ते आपण ठाकरेंशी एकनिष्ठ असल्याचा दावा करतात. जर ते पक्षाशी एकनिष्ठ असल्याचे सांगतात मग उरण परिसरातच महाविकास आघाडीचे उमेदवार मनोहरशेठ भोईर यांना हवेतसे मताधिक्य का मिळाले नाही? याबाबत कोणताच जबाबदार पदाधिकारी बोलण्यास तयार नाही.
विधानसभा निवडणुका होऊन काही महिन्याचा अवधी उलटूनही झालेल्या पराभवानंतर ठाकरे गटाचे पदाधिकारी हवे तसे आक्रमक झालेले दिसत नाही. उलट पक्षात मरगळ आल्याचे चित्र पहावयास मिळत असल्याचे शिवसैनिक सांगतात. विधानसभा निवडणुकीनंतर नवे सरकार स्थापन झाले. त्यामध्ये शिंदे गटाचे जिल्ह्यातील आमदारांचा मंत्रीमंडळात समावेश करण्यात आला. या नवनिर्वाचित मंत्री महोदयांचे ठाकरे गटाच्या काही पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन अभिनंदन केले तर काही पदाधिकारी हे नागपूर अधिवेशनात नागपूरमध्ये ठाण मांडून बसून त्यांच्या जवळ घुटमळत होते. काही पदाधिकारी हे खासदारांना भेटून आपली निष्ठा दाखवीत आहेत. मग हे पदाधिकारी ठाकरेंच्या पक्षाशी एकनिष्ठ फक्त दाखवण्यापूरते असल्याची चर्चा शिवसैनिकांत सुरू आहे.
जिल्हाप्रमुख व माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या आदेशानुसार अनेक आंदोलनं, निदर्शनं करण्यात आली होती. त्यावेळी ठराविक पदाधिकारी सोडले तर अनेक पदाधिकारी याकडे फिरकत नसल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. उरण शहरात व तालुक्यात अनेक समस्या आ वासून असतानाही याबाबत कोणीही पदाधिकारी साधा आवाज उठवितानाही दिसत नाही. यामुळे ठाकरे गटाच्या शिवसैनिकांत संभ्रमाचे वातावरण पसरले आहे. पक्षाच्या वरिष्ठांनी याकडे लक्ष देण्याची मागणी ठाकरेंच्या शिवसैनिकांकडून जोर धरू लागली आहे.
