• Sat. Jun 21st, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रवींद्र धंगेकर धनुष्यबाण हाती घेणार? मुंबईत एकनाथ शिंदे यांची घेतली गुप्त भेट!

ByEditor

Jan 30, 2025

मुंबई : विधानसभा निवडणुकीत पराजय झाल्यापासून रवींद्र धंगेकर पक्षावर काहीसे नाराज आहेत. गुरुवारी त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने ते शिवसेना प्रवेशाचा निर्णय घेणार का? अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत.

रवींद्र धंगेकर हे काँग्रेसचे झुंजार नेते. मनसेमधून काँग्रेसमध्ये आल्यानंतर त्यांनी पुण्यातील कसबा मतदारसंघ बांधला. मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर निवडणूक लागलेल्या कसब्यात त्यांनी भाजपला अस्मान दाखवून विधानसभेत पाऊल ठेवले. केवळ दीड वर्षे काम करायला मिळाल्यानंतर ते पुन्हा २०२४ च्या विधानसभेला सामोरे गेले. परंतु यंदा विजयाची पुनरावृत्ती झाली नाही. भाजपच्या हेमंत रासने यांनी बाजी मारून धंगेकर यांना पराभूत केले आणि मागील पराजयाचा बदलाही घेतला. विधानसभेतील पराजयापासून धंगेकर पक्षात काहीसे नाराज असल्याची चर्चा आहे.

रवींद्र धंगेकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गुरुवारी शासकीय निवासस्थानी भेट घेतली. उभय नेत्यांमध्ये जवळपास अर्धा तास भेट झाल्याची माहिती आहे. सध्याच्या घडामोडींच्या अनुषंगाने त्यांनी चर्चा केली. चर्चेनंतर बाहेर पडताना माध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांना बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र कोणतीही प्रतिक्रिया देण्यास त्यांनी नकार दिला. रवींद्र धंगेकर यांनी एकनाथ शिंदे यांची गुप्त भेट घेण्यामागे काय कारण असावे? त्यांच्या मनात काँग्रेस सोडून शिवसेनेत जाण्याविषयी द्वंद्व सुरू आहे का? की आणखी कोणत्या विषयासाठी त्यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली, असे प्रश्न सध्या राजकीय वर्तुळात चर्चिले जात आहेत.

काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे आमदार आमच्या गळाला लागणार आहेत, असे उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले होते. त्यांच्या दाव्यानुसार धंगेकर हे त्यातीलच एक माजी काँग्रेस आमदार असावेत का? असेही विचारले जात आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!