क्रीडा प्रतिनिधी
अलिबाग : रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित केलेल्या इनफोकस पिक्चर ऍण्ड एचआर फिटनेस एकदिवसीय ४० षटकांच्या चॅम्पियन्स ट्रॉफी लीग स्पर्धेचा अंतिम सामना अलिबाग क्रिकेट अकॅडमी विरुद्ध पेण स्पोर्ट्स असोसिएशन ह्या दोन संघांमध्ये सोमवार, दि. ३ फेब्रुवारी रोजी पेण येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर रंगणार आहे.
अलिबाग क्रिकेट अकॅडमीचा संघ कर्णधार हृषिकेश राऊत यांच्या नेतृत्वाखाली तर पेण स्पोर्ट्स असोसिएशनचा संघ कर्णधार प्रतिक म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. दोन्ही संघांमध्ये नामवंत खेळाडू असून अंतिम सामना रंगतदार होणार असल्याचे दिसून येत. रायगड जिल्ह्यातील एकूण २१ अकॅडमी व क्लबच्या संघांनी ह्या स्पर्धेत सहभाग घेतला होता. स्पर्धा प्रथम साखळी व नंतर बाद फेरीनुसार खेळवली गेली. एकूण २८ एकदिवसीय ४० षटकांचे सामने रायगड जिल्ह्यातील विविध मैदानावर पार पडले. स्पर्धेत उत्कृष्ठ कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची निवड रायगड जिल्ह्यच्या संघात केली जाणार असून पुढे रायगडचा संघ महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या आंतरजिल्हा निमंत्रित निवड चाचणी स्पर्धेसाठी सहभागी होईल. सदरच्या स्पर्धेला खोपोली येथील रोहित कार्ले यांच्या इनफोकस पिक्चर व अलिबाग येथील हृषिकेश राऊत यांच्या एचआर फिटनेस जिम यांनी पुरस्कृत केले आहे. रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील सचिव प्रदिप नाईक यांच्यासह सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी अंतिम सामन्यासाठी दोन्ही संघांच्या खेळाडूंना शुभेच्छा दिल्या आहेत.