• Sun. Jun 22nd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

आज श्री क्षेत्र स्वयंभू गणपती मंदिर मूगवलीचा जन्मोत्सव

ByEditor

Feb 1, 2025

सलीम शेख
माणगाव :
तालुक्यातील श्री क्षेत्र मुगवली येथील श्री स्वयंभू गणपती मंदिरात आज शनिवार दि. १ फेब्रुवारी २०२५ रोजी “श्रीं”चा जन्मोत्सव सालाबादप्रमाणे संस्थेचे विश्वस्त यांनी करण्याचे ठरविले आहे. तरी या धार्मिक समारंभास उत्सवानिमित्त होणारे कार्यक्रम शिस्तीने, शांततेने, उत्साहाने व चांगल्या प्रकारे पार पडण्यास सहकार्य करून उत्सवाला शोभा आणावी व “श्रीं”चे दर्शन प्रसन्न चित्ताने ध्यान मग्न होऊन घ्यावे तसेच तीर्थप्रसादाचा लाभ घेऊन आपले जीवन कृतार्थ करावे अशी विनंती गणपती मंदिर विश्वस्त कार्यकारी मंडळ यांच्यातर्फे करण्यात आली आहे.

यादिवशी सकाळी ७ ते ९ वाजता श्री मूर्ती महापूजा सोहळा (अभिषेक) उपाध्याय श्री. राजू श्रीकृष्ण पंडित – गोरेगाव, सकाळी ११ वा. श्री गणेश जन्मोत्सव कीर्तन ह.भ.प. कीर्तनकार श्री. नंदकुमार कर्वे – पनवेल, दुपारी १२:४० वा. श्री गणेश जन्म, दुपारी १ वा. श्री गौरक्षनाथ नाथ संप्रदाय भजन मंडळ माणगाव यांचे सुश्राव्य भजन, दुपारी २ वा. श्री गणेश यागारंभ, सायंकाळी ७ वा. याग पूर्णाहुती, रात्री १२ :३० वा. महानैवेद्य, महाआरती व प्रसाद असे कार्यक्रम होणार असल्याचे श्री क्षेत्र स्वयंभू गणपती मंदिर मुगवली विश्वस्त व कार्यकारी मंडळ अध्यक्ष तुकाराम म्हस्के, माजी अध्यक्ष भास्कर म्हस्के, उपाध्यक्ष विठोबा म्हस्के, सचिव राजेंद्र म्हस्के, खजिनदार महादेव म्हस्के, सदस्य मिलिंद म्हस्के, नितीन म्हस्के, सिताराम म्हस्के, नथुराम म्हस्के, सुरेश म्हस्के, प्रकाश तेटगुरे, व्यवस्थापक श्री स्वयंभू स्वयंसेक व ग्रामस्थमंडळी मुगवली यांनी केली आहे.

मराठी मनाचे गणेश हे लाडके दैवत आहे. त्या गणेशाची पुजाअर्चा करूनच शुभकामाला सुरूवात केली जाते. कोकणात या गणेशोत्सव काळात भक्तीला उधाणच येते. गजाननाची अनेक रुपे आहेत. त्यापैकीच एक असलेल्या माणगाव जवळील मुगलीच्या गणपतीचे स्थान हे जागृतम्हणून परिचीत आहे. शिवाय भक्तांच्या नवसाला पावणारा गणपती म्हणूनही त्याची सर्वत्र ख्याती आहे. रायगड जिल्हातील मुंबई-गोवा महामार्गावर माणगावपासून ३ कि. मी. अंतरावर मुगवली फाटा आहे. तेथून अवघ्या दिड किमी अंतरावर हे स्वयंभू गणेश मंदिर आहे. मुगवली हे शंभर ते सव्वाशे घरांचे छोटे गाव आहे. गाव जरी छोटे असले, तर या गणपतीमुळे त्याची ख्याती सर्वदूर पसरली आहे.

सुमारे 325 वर्षापूर्वी मुगवलीच्या परिसरातील एका शेतात एक शेतकरी नांगरणी करीत होता. अचानक शेतातील एका दगडास नांगराचा फाळ लागून तेथून रक्त येऊ लागले. हे पाहून त्या शेतकऱ्याने गावाकडे धाव घेऊन घडलेली सर्व हकीकत गावकऱ्यांना सांगितली. सर्व ग्रामस्थांनी याबाबत गोरेगावच्या जाणकारांचा सल्ला घेतला व हे गणेशाचे स्वयंभू महास्थान आहे, असे त्यांनी सांगितल्यावर ग्रामस्थांनी त्या पाषाणाभोवतालची जागा स्वच्छ केली. त्यानंतर सर्वांनाच नैसर्गिक अवस्थेतील गणेशाचे मोहक दर्शन झाले. ही मूर्ती जमिनीतून वर आलेल्या दोन फूट लांबी-रुंदीच्या पाषाणावर नैसर्गिक अवस्थेत असून, मस्तक, उभी वळलेली सोंड, पोट अशा स्वरुपाची आहे. मागील बाजूस सिंह असून, त्यास पाठ टेकून खाली पाय सोडून तो बसलेला आहे. गणेशाचे नेत्र नैसर्गिक अवस्थेत असल्यामुळे त्याचे डोळे बोलके वाटतात.

सर्व ग्रामस्थांनी व परिसरातील नागरिकांनी सुप्तावस्थेत असलेल्या या जागृत गणेशासाठी सुरूवातीस एक कुडाचे मंदिर उभारले. त्यानंतर प्राचीन काळातील या मंदिराचा 35 वर्षापूर्वी जीर्णोद्धार करून गाभाऱ्यात संगमरवरी दगड बसविण्यात आला व मंदिरही थोडे प्रशस्त करण्यात आले. 1968 साली मुगवलीच्या स्थानिक स्वयंभू गणेश मंडळाने गणेश व्यवस्थापन समिती स्थापन करून श्रींच्या भोवती उत्तमपैकी छोटासा गाभारा बांधला आणि दररोजच्या गणेशपुजेची व्यवस्था केली. पूर्वीच्या जुन्या कौलारू मंदिराचे रुपांतर आता भव्य अशा सिमेंट काँक्रीटच्या 22 फूट रुंद व 30 फूट लांब अशा सुंदर मंदिरात झाले आहे. मंदिराचे शिखर मुंबई-महाड महामार्गावरील मुगवली फाट्याजवळूनही दिसते. येथील गणेश हा पूर्वीभिमूख आहे. त्यामुळे गणेशाच्या मूर्तींवर दररोज सूर्यकिरण पडावेत अशीही कल्पकता मंदिर बांधताना योजण्यात आली आहे. हा गणेश नवसाला पावतो अशी भाविकांची श्रद्धा असल्याने हा गणपती जागृत देवस्थान म्हणून परिचीत आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातून तसेच मुंबई-पुण्यातून भाविक मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी येऊन येथे नवस बोलतात व आपण बोललेला नवस फेडण्यासाठीही मोठ्या संख्येने येत असतात.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!