अनंत नारंगीकर
उरण : श्री गणेश जयंती सोहळ्यानिमित्त हजारो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या श्री महागणपती मंदिराला फुलांची सजावट करण्यात आली होती. श्री गणेश जयंती सोहळा हा शनिवारी (दि. १) आल्याने आपल्या लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी पहाटे ४ वाजल्यापासून भाविकांनी गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळत होते. यावेळी श्रींच्या भक्तीमय वातावरणात मंदिर परिसर दुमदुमून गेले होते.

भक्तांच्या हाकेला धावून जाणारा चिरनेर गावातील श्री महागणपती देवस्थानची ख्याती दुरवर पसरल्याने शनिवारी (दि. १) उरण बरोबर पनवेल, नवीमुंबई, मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, पेण, अलिबाग परिसरातील अबालवृद्ध आपआपल्या कुटुंबासह श्रींच्या दर्शनासाठी तसेच आपले नवस फेडण्यासाठी ये-जा करत होते. श्री गणेश जयंती सोहळ्यानिमित्त उत्सव कमिटीच्या वतीने श्रींचा अभिषेक, भजन तसेच हभप हर्षल जोगळेकर (पुणे) यांचे श्रींच्या जन्माचे सुश्राव्य किर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. तसेच भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन मंदिर परिसरात करण्यात आले होते.
मंदिर परिसराजवळ असणार्या रस्त्यांवर खाद्यपदार्थ विक्रेते आणि विविध वस्तूंचे विक्रेते यांनी स्टॉल लावले होते. त्यामुळे येथे जणू जत्रेचेच स्वरूप यावर्षी मोठ्या स्वरूपात प्राप्त झाले होते. श्रींचे दर्शन घेण्यासाठी कुटुंबासह येणारे नागरिक येथे खाद्यपदार्थांचा आस्वाद घेताना दिसत होते. तसेच विविध वस्तूंची खरेदी करत असल्याचे चित्र पाहायला मिळत होते. यावेळी भाविकांना श्रींचे दर्शन निर्विघ्नपणे घेता यावे यासाठी श्री गणपती देवस्थान विश्वस्त मंडळ चिरनेरचे अध्यक्ष महेंद्र पाटील, उपाध्यक्ष मंगेश पाटील, सचिव अमर ठाकूर, विजय पाटील, संतोष ठाकूर, अमित मुंबईकर, चंदन कडू, कैलास पाटील, गाव कमिटी अध्यक्ष सुजित पाटील, उपाध्यक्ष किरण भाकुर्लेकर, मयुर म्हात्रे यांच्यासह ग्रामस्थ सहकार्य करत होते.