• Wed. Jul 23rd, 2025 5:20:53 AM

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

मुंबई-गोवा महामार्गाच्या कोलाड विभागातील पुल व रस्त्याच्या कामातील विलंबाबाबत उपविभागीय दंडाधिकारी रोहा यांना निवेदन

ByEditor

Feb 7, 2025

विश्वास निकम
कोलाड
: मुंबई-गोवा महामार्गाचे कोलाड विभागातील पुल व रस्त्याच्या कामात दिवसेंदिवस विलंब होत असल्यामुळे या समस्येमुळे ग्रासलेले कोलाड विभागातील सुज्ञ नागरिक यांनी उपविभागीय दंडाधिकारी रोहा यांना लेखी निवेदन दिले आले.

दिलेल्या लेखी निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग ६६ वरील चौपदरीकरणाचे काम गेली १७ वर्षांपासून सुरु असुन आम्ही नागरिक प्रशासनाला सहकार्य करून आमच्या बाजारपेठेतील तसेच रस्त्यालगतची दुकाने तथा इमारती तोडून रस्त्यासाठी जागा मोकळी करून दिली. परंतु, प्रशासनाच्या कामाकडील दुर्लक्ष व हलगर्जीपणामुळे रस्त्याच्या व पुलाच्या कामाला विलंब होत आहे. त्या अपूर्ण कामामुळे नागरिकांना मोठया प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. रखडलेल्या कामामुळे अपघाता होऊन शेकडो नागरिक जायबंदी झाले आहेत, तर अनेकांनी आपले प्राण गमावले आहेत. तसेच रस्त्याच्या साईडपट्ट्या व कामातील खोदकामामुळे सर्वत्र मातीचे व धुळीचे साम्राज्य पसरून दुकानदार व स्थानिक रिक्षा, टेम्पो चालक व पदाचारी यांना श्वसनाचे मोठया प्रमाणावर त्रास उद्भवत आहेत. तसेच कामाचा दर्जा हा सुमार आहे.

नुकताच चार दिवसापूर्वी आंबेवाडी नाका येथील पोस्ट ऑफिस शेजारी गटारावर टाकलेला स्लॅब लगेचच कोसळला. ही चूक झाकण्यासाठी संबंधित ठेकेदार यांनी त्यावर माती टाकून ती चूक लपविण्याचा प्रयत्न केला. तेथेही नागरिकांची वस्ती आहे. सदर रस्त्यावरून रहिवाशी नागरिक व वाहने ये-जा करीत असतात एक छोटा अपघात वगळता सुदैवाने कोणताही मोठा अपघात झाला नाही. परंतु, असा कोणताही मोठा अपघात झाला तर संबंधित ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दखल व्हावा. तसेच संबंधित ठेकेदाराविषयी आंबेवाडी ग्रामपंचायतीच्यावतीने ग्रामपंचायतीत ठराव करून वारंवार पत्रव्यवहार केला असता त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचे उत्तर देण्यात आले नाही. तरी आपण सरकारी यंत्रणेमार्फत योग्य ती उपाययोजना करावी. अन्यथा आम्ही नागरिक रस्त्यावर उतरून आंदोलन करू असे लेखी निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

यावेळी उपविभागीय दंडाधिकारी यांना निवेदन देताना चंद्रकांत लोखंडे (शिवसेना उपतालुका प्रमुख), संजय कुर्ले (सामाजिक कार्यकर्ते), गणेश शिंदे (शाखा प्रमुख), महेंद्र वाचकवडे (अध्यक्ष, व्यापारी संघटना), चंद्रकांत जाधव (शिवसेना पदाधिकारी) उपस्थित होते.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!