क्रीडा प्रतिनिधी
अलिबाग : पोयनाड खारेपाट विभाग क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने आयोजित करण्यात आलेल्या पांडवादेवी प्रीमियर लीग कै. सचिन पाटील स्मृतीचषक पर्व तिसरे क्रिकेट स्पर्धेत आरोही पुरस्कृत मरीआई लेभी (संघ मालक कल्पेश पाटील) यांच्या संघाने स्पर्धेत अंतिम विजयी होण्याचा मान मिळवला आहे.
दि. ७, ८ व ९ फेब्रुवारी रोजी झुंझार युवक मंडळ पोयनाडच्या भव्य-दिव्य क्रीडांगणावर आयोजित टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना मन इलेव्हन पेझारी (संघ मालक विकास जाधव) विरुद्ध आरोही पुरस्कृत मरीआई लेभी संघ (मालक कल्पेश पाटील) ह्या दोन संघांमध्ये खेळला गेला. अतिशय अटीतटीच्या झालेल्या अंतिम सामन्यात मरीआई लेभी संघाचा आतिशी फलंदाज स्वप्नेश यांनी शेवटच्या क्षणापर्यंत सामन्यात रंगत ठेवत एखरच्या क्षणी विजयी षटकार ठोकत संघाला विजय मिळवून दिला. प्रथम फलंदाजी करत असताना मन इलेव्हन पेझारी संघानी ५ षटकांमध्ये ५९ धावा केल्या होत्या. विजयासाठी ६० धावांचे लक्ष घेऊन फलंदाजीला आलेल्या मरीआई लेभी संघानी कडवी झुंज देत फलंदाजीला सुरुवात केली. शेवटच्या षटकात विजयासाठी १८ धावांची गरज असताना दमदार फलंदाज स्वप्नेश यांनी तीन षटकार ठोकून संघाला विजय मिळवून दिला.
पांडवादेवी प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत एकूण १६ संघांच्या संघ मालकांनी लिलाव पद्धतीने विभागातील खेळाडूंना आपल्या संघात समावेश करून घेतला. प्रथम लीग व त्यानंतर बाद फेरीनुसार स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेत चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरला तो डी .एम. ग्रुप शहाबाज (संघ मालक प्रतिक म्हात्रे) तृतीय क्रमांक पटकावला तो शिवशंभो घसवड (संघ मालक प्रणय वाघमारे) द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरला तो मन इलेव्हन पेझारी (संघ मालक विकास जाधव) यांचा संघ तर स्पर्धेत अंतिम विजयी होण्याचा मान मिळवला तो आरोही पुरस्कृत मरीआई लेभी (संघ मालक कल्पेश पाटील) यांच्या संघाने. अंतिम सामन्याचा सामनावीर म्हणून स्वप्नेश, उत्कृष्ठ गोलंदाज तेजस शेळके, उत्कृष्ठ क्षेत्ररक्षक विवेक, उत्कृष्ठ फलंदाज व सिक्सर किंग निखिल पाटील, स्पर्धेचा मालिकावीर म्हणून विनय यांना रेसर सायकल पोयनाडचे माजी उपसरपंच सचिन पाटील, भूषण चवरकर, झुंझारचे सचिव किशोर तावडे, सदस्य अजय टेमकर, विनायक पाटील, अमोल पाटील यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.