अतिक्रमणाकडे तहसीलदारांचे दुर्लक्ष; कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी
अतिक्रमण हटवून अनधिकृत पार्किंग बंद करण्याची पागोटे ग्रामपंचायतची मागणी
विठ्ठल ममताबादे
उरण : पागोटे हद्दीमध्ये ४३.०२.४० हे. आर. ही गुरचरण जमीन पागोटे गावची असून लगतच सिडकोची ४.२५ एकर जमीन असून गुरुचरण व सिडको या दोन्ही जमिनीवर दत्तू भिवा ठाकूर, रा. धुतुम, ता. उरण, जि. रायगड यांनी गेली तीन ते चार महिने अतिक्रमण करून अनाधिकृत गाड्यांची पार्किंग चालू केली आहे. याबाबत ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत कमिटी यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन अनाधिकृत पार्किंग हटविण्याची कारवाई केली. परंतु दत्तू भिवा ठाकूर हे कारवाईला न जुमानता मनमानी करीत असून अतिक्रमण केलेली जागा माझी स्वतःची असून मला सिडको प्रशासनाने दिलेली आहे असा कांगाव करीत असून प्रत्यक्ष त्याबाबत त्यांच्याकडे कोणताही आदेश अथवा ठोस पुरावा नसतानाही गाड्यांची पार्किंग नवघरचे मंगेश पाटील यांना भाडेतत्वावर चालवायला दिली आहे.

याबाबत विद्यमान ग्रामपंचायत कार्यकारणी सभासदांनी प्रत्यक्ष जावून उरण तहसिलदार उद्धव कदम यांच्या दालनात जावून गुरचरण जमिनीवरील अतिक्रमणावर चर्चा केली. परंतु दत्तू भिवा ठाकूर यांच्यावर कोणतीही कारवाई आज मितीस करण्यात आलेली नाही. गुरचरण जागेवरील अतिक्रमण केलेल्या जागेवर दत्तू भिवा ठाकूर यांना सिडकोकडून जमीन त्यांच्या नावाने असल्याचे आदेश दिले आहेत का? याबाबत ग्रामपंचायतीने सिडको प्रशासनाकडे आदेशाची मागणी करीत वारंवार पत्रव्यवहार करण्यात आला आहे. परंतु सिडको प्रशासन त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याने आज मीतीस कोणताही आदेश ग्रामपंचायतीला प्राप्त झालेला नाही. तसेच प्रत्यक्ष जागेची मोजणी करून जागा ग्रामपंचायतीच्या ताब्यात मिळावी याबाबत संबंधित कार्यालयांकडे पत्रव्यवहार करूनही कोणतीहि कारवाई करण्यात आलेले नाही.

दत्तू भिवा ठाकूर यांनी अतिक्रमण करून अनाधिकृत गाड्यांची पार्किंग चालू केली असून त्यास तीन ते चार महिने होऊन अद्याप त्याबाबत कोणतीही कारवाई झाल्याचे दिसून येत नाही. दत्तू भिवा ठाकूर ही व्यक्ती ज्या जागेवर पार्किंगचा व्यवसाय करीत आहे तो व्यवसाय करण्याकरीता सिडकोच्या कोणत्या अधिकाऱ्याने मंजुरी दिली आहे का? की सिडकोतील अधिकाऱ्याचा वरदहस्त आहे त्यांच्यामुळे ह्या व्यक्तीवर कारवाई होत नाही असे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांना वाटू लागले आहे. गुरचरण जागेवरील अनाधिकृत पार्किंग तात्काळ हटविण्यात यावी याबाबत ग्रामपंचायतीने संबंधित कार्यालयाकडे वारंवार पत्र व्यवहार करूनही प्रशासन त्याच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे असे ग्रामपंचायतच्या निदर्शनास येत असून जागेवर अतिक्रमण होऊन जागा हडप झाली काय? असा सवाल आता उपस्थित होत आहे. या घटनेचा प्रशासनाला काहीही फरक पडणार नाही असे या सर्व बाबीवरून स्पष्ट होत आहे.

सदर गुरचरण जागा पागोटे गावाची असून गुरचरण जागेवरील अतिक्रमण तात्काळ हटवून द्यावे अशी मागणी पागोटे ग्रामपंचायतने जिल्हाधिकारी रायगड, उपविभागीय अधिकारी पनवेल, सिडको संचालक सिडको भवन बेलापूर नवी मुंबई, नवी मुंबई पोलीस आयुक्त, न्हावा शेवा पोर्ट विभाग उरणचे सहाय्यक पोलीस आयुक्त, गटविकास अधिकारी पंचायत समिती उरण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक उरण पोलीस ठाणे आदी ठिकाणी वारंवार पत्रव्यवहार करून केली आहे. मात्र प्रशासन या अनधिकृत पार्किंगकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करीत असल्यामुळे जनतेतून संताप व्यक्त केले जात आहे. तहसीलदार उद्धव कदम यांनी अधूनमधून अनधिकृत पार्किंग व अतिक्रमणवर कारवाई केली होती, पण परत तिथे अतिक्रमण होते व अनधिकृत पार्किंग सुरु होते. त्यामुळे यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी केली जात आहे. अनधिकृत पार्किंग चालविणाऱ्या व शासनाचे कोणतेही परवानगी नसणाऱ्या गुरुचरण व सिडकोच्या जागेवरील अतिक्रमण हटवून दत्तू भिवा ठाकूर यांनी चालू केलेली अनधिकृत पार्किंग तात्काळ हटवावी अशी मागणी पागोटे ग्रामपंचायत व जनतेने सुद्धा केली आहे.