अटीतटीच्या सामन्यात गोरेगांव प्रेस क्लब संघाने मारली बाजी; रोहा पत्रकार संघ ठरला उपविजेता
विनायक पाटील
पेण : महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई संलग्न पेण पत्रकार संघाच्या वतीने रायगड जिल्ह्याच्या सर्व पत्रकार बांधवांसाठी बुधवार ता.१२ फेब्रूवारी रोजी पेण नगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर एक दिवसीय भव्यदिव्य क्रिकेट सामान्यांचे आयोजन करण्यात आले होते. भव्यदिव्य अशा झालेल्या क्रिकेट सामन्याला जिल्ह्यातील पत्रकारांचा उत्स्फूर्त असा सहभाग लाभला. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात कोणतेही गालबोट न लागता हे सामने पार पडले. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ रोहा व गोरेगाव प्रेस क्लब यांच्यात रंगतदार झालेल्या अंतिम सामन्यात १ बॉल ६ रनची गरज असताना गोरेगांव संघाच्या खेळाडूने षटकार लगावल्याने महाराष्ट्र राज्य पत्रकार संघच्या क्रिकेट सामन्यातील प्रथम क्रमांकावर आपले नाव कोरले.

सकाळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेश सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे, कोकण विभागीय अध्यक्ष शैलेश पालकर, रायगड जिल्हाध्यक्ष राकेश खराडे, समीर वारे, पेण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप बागुल, ॲड. मंगेश नेने, वनविभाग अधिकारी कुलदीप पाटकर, राजुशेठ पिचिका, मुदस्सीर अखवारे, दत्ता कांबळे, आरटीओ अधिकारी महेश देवकाते, जिल्हा वाहतूक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे, प्रवीण पाटील, नंदेश पाटील, महावितरणचे अधिकारी श्री. मेश्राम, हरीश बेकावडे, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ पेण अध्यक्ष राजेश कांबळे, उपाध्यक्ष विनायक पाटील, सचिव स्वप्निल पाटील, सहसचिव सुदर्शन शेळके, खजिनदार किरण बांधणकर, सल्लागार दिपक लोके, सह सल्लागार गणेश पाटील, सदस्य रुपेश गोडिवले, मितेश जाधव, प्रशांत पोतदार तसेच मान्यवरांच्या उपस्थितीत श्रीफळ वाढवून क्रिकेट सामन्याची सुरुवात करण्यात आली.

स्पर्धेच्या सुरुवातीला पेण पोलीस विरुद्ध महावितरण पेण संघ तर सामाजिक व राजकीय मंडळी व प्रांत, तहसील, वनविभाग कर्मचारी पेण यांच्यात मैत्रीपूर्व सामना खेळवण्यात आला. पनवेल खारघर, अलिबाग, नागोठणे, गोरेगाव, खालापूर, रोहा, पेण आदी जिल्ह्यातील पत्रकार तसेच जेएसडब्ल्यूचे अधिकारी आत्माराम बेतकेकर, रायगड जिल्हा परिषद माजी बांधकाम सभापती संजय जांभळे, बाफना ज्वेलर्सचे विशाल बाफना, गॅलेक्सी हॉस्पिटलचे डॉ. रत्नदीप गवळी, डायरेक्टर रोहन पंदारे, ज्येष्ठ पत्रकार विजय मोकल, पेण प्रेस क्लबचे अध्यक्ष देवा पेरवी तसेच राजकीय, सामाजिक, क्रिकेट प्रेमी यांनी सकाळपासून मैदानावर उपस्थीत राहून खेळाचा मनमुराद आनंद लुटला.

अंतिम सामना महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ रोहा व गोरेगाव प्रेस क्लब यांच्यात होऊन गोरेगाव प्रेस क्लब संघाने बाजी मारत विजय संपादन करताच गोरेगाव संघाचे भारत गोरेगावकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी मैदानावर जल्लोष साजरा केला. द्वितीय क्रमांक रोहा संघ, तृतीय क्रमांक अलिबाग तर चतुर्थ क्रमांक पेण संघाने पटकावला. या सामन्यातील मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी रोहा संघातील आशिष मोरे ठरला. त्याला होम थिएटर देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. उत्कृष्ट फलंदाज पेण संघाचा मंथन पाटील, उत्कृष्ट गोलंदाज गोरेगाव संघाचा आदिनाथ आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक गोरेगाव संघाचा प्रणित यांना ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेतील उत्कृष्ट गणवेशाची ट्रॉफी नागोठणे संघाला देण्यात आली.

रायगड जिल्हा परिषद माजी बांधकाम सभापती संजय जांभळे व बाफना ज्वेलर्सचे विशाल बाफना यांच्या हस्ते विजयी संघास पारितोषिक देण्यात आले. यावेळी क्रिकेट प्रमाणेच कबड्डी स्पर्धेचे आयोजनही पत्रकारांनी करावे यासाठी आम्ही नेहमी सहकार्य करण्यासाठी पत्रकार यांच्या सोबत असल्याचे माजी सभापती संजय जांभळे यांनी बोलताना सांगितले. कोकण विभागीय अध्यक्ष शैलेश पालकर यांनी पेण पत्रकारांनी उत्तम असे क्रिकेट सामन्याचे आयोजन केल्याने कौतुक केले. सर्वांनी एकत्र येऊन पुढेही समाजहिताचे कार्य करायचे असल्याचे सांगितले तर विशाल बाफना व जिल्हा अध्यक्ष राकेश खराडे यांनीही आपले विचार मांडले.

सामन्यासाठी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार पेण संघाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, पदाधिकारी यांनी मेहनत घेतली तर क्रिकेट सामन्याला जिल्ह्यातील पत्रकारांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला होता.
