प्रख्यात सर्जन डॉ. निशिथ ध्रुव यांचे निधन; साश्रू नयनांनी रोहेकरांनी दिला निरोप
प्रतिनिधी
रोहा : रोहेकरांना गेली ४३ वर्षे वैद्यकीय सेवा देणाऱ्या येथील प्रख्यात अमृता परिचारिणी हॉस्पिटलचे ज्येष्ठ आणी निष्णात सर्जन डॉ. निशिथ ध्रुव यांचे बुधवारी रात्री मुंबई येथे दुखद निधन झाले. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने तालुक्यात सर्वत्र शोककळा पसरली. बुधवारी रात्री पासूनच नागरिकांनी सोशल माध्यमातून हळहळ व्यक्त केली, सकाळी त्यांचे पार्थिव रोह्यात आणल्यावर त्यांच्या हॉस्पिटल येथिल निवास्थानी विविध क्षेत्रातील मान्यवरांसह मोठ्या संख्येने नागरिकांनी आपल्या आवडत्या डॉक्टररांना शेवटचे पाहण्यासाठी गर्दी केली होती. अंत्य यात्रेमध्ये ही मोठ्या संख्येने सहभागी होत रोहेकरांनी डॉ. ध्रुव यांना साश्रू नयनांनी निरोप दिले.
डॉ. ध्रुव हे वरसे येथील त्यांच्या घरात स्टूलावरून खाली पडल्याने त्यांच्या डोक्याला मोठी दुखापत झाली, त्यांना त्वरित येथील डॉ. जाधव नर्सिंग होम येथे उपचारासाठी दाखल केले गेले. डोक्याला फारमोठा मार लागल्याने रक्तस्त्राव होत असल्याने ते बेशुद्ध झाले. त्यांना पुढील उपचारार्थ तातडीने मुंबई येथील भाटिया हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले. परंतु बुधवारी दि.१२ रोजी रात्री मुंबई येथे उपचारा दरम्यान त्यांची प्राण ज्योत मालवली. मृत्यू समयी त्यांचे वय ७० वर्षांचे होते. त्यांच्या निधनाची बातमी बुधवारी रात्री समजताच नागरिकांना दुःख अनावर झाले, तालुक्यात सर्वत्र शोककळा पसरली.
डॉ. ध्रुव यांनी सुरुवातीच्या काळात येथील संजय गांधी हॉस्पिटलमध्ये काम केल्यानंतर रोह्यात स्वतःच्या मालकीचे हॉस्पिटल उभारले. रोहा व बाजूच्या माणगाव, तळा, पाली तालुक्यातील रुग्णांना त्यांनी ४३ वर्षे वैद्यकीय सेवा दिली. रोहा तालुक्यासाठी त्यांचे फार मोठे योगदान राहिले. वैद्यकीय क्षेत्रात त्यांच्या अकाली निधनामुळे हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी डॉ. पूर्वी ध्रुव व सुपुत्र डॉ. अभिलाष ध्रुव, सून, नातवंडे असा परिवार आहे. गुरुवारी सकाळी त्यांचे पार्थिव रोहा येथे आणण्यात आले. दुपारी त्यांच्या निवासस्थानावरून निघालेल्या अंत्ययात्रेत वैद्यकीय, औद्योगिक, राजकीय, सामाजिक अशा विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह मोठ्या संख्येने रोहेकर उपस्थित होते. रोहा येथील वैकुंठधाम स्मशानभूमी येथे साश्रू नयनांनी रोहेकरांनी त्यांना निरोप दिले. यावेळी मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली तसेच ध्रुव कुटुंबियांचे सांत्वन केले.