अधिकारी व कर्मचाऱ्यांची खातेनिहाय चौकशी व्हावी; गावकऱ्यांची मागणी
उरण तहसील कार्यालयाच्या अखत्यारीत ३५ हून अधिक अनधिकृत कंटेनर यार्ड
अनंत नारंगीकर
उरण : तहसील कार्यालय उरणच्या लेखी सुमारे ३५ हून अधिक कंटेनर यार्ड अनधिकृत आहेत. मात्र, या सर्वच अनधिकृत कंटेनर यार्डना नियमित वीजपुरवठा व पाणीपुरवठा केला गेला असून नळ व वीज जोडणीसाठीचे ना हरकत दाखले त्या-त्या ग्रामपंचायतींनी अगदी बिनबोभाटपणे अर्थपूर्ण व्यवहार करून दिले असल्याची माहिती सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

उरण तालुका हा शासकीय अधिकारी वर्गाला सोन्याची अंडी देणारी कोंबडी म्हणून ओळखली जात आहे. त्यामुळे या तालुक्यात येणारे विविध खात्यांचे अधिकारी हे सर्वसामान्य जनतेच्या समस्यांचे निराकरण न करता धनदांडग्यांच्या चौकटीत आपला कारभार चालविण्यात धन्यता मानत आहेत. सध्या या तालुक्यात छोटे मोठे असे ३५हून अधिक अनधिकृत कंटेनर यार्ड आहेत. सर्वच कंटेनर यार्डचे कामकाज हे उरण तहसील कार्यालयाच्या कृपाशिर्वादाने बिनबोभाटपणे सुरू आहेत. या प्रकरणी कोणी तक्रार केली तर केवळ दंडवसुलीच्या पलीकडे जाऊन कोणतीही कारवाई उरण तहसील कार्यालय करत नाही.

आश्चर्याची बाब म्हणजे काही कंटेनर यार्ड हे शासकीय नियमांची पायमल्ली करून खाडीकिनारी, वन जमीन, पाणलोट क्षेत्र, लहान मुलांच्या दफनभूमी जागेत, गुरचरण जागेत, गव्हाण फाटा ते चिरनेर, दास्तान फाटा ते दिघोडे, खोपटा पुल ते चिरनेर, कोप्रोली ते वशेणी या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यालगत तसेच सरकारी जागेत दगड मातीचा भराव टाकून उभे राहिले आहेत. त्याबाबत उरण तहसील कार्यालय मात्र मूग गिळून बसले आहे. दरम्यान, यापैकी काही कंटेनर यार्डनी विविध गावांच्या वहिवाटीच्या वाटा आणि नैसर्गिक पाणी निचऱ्याचे नाले गायब करून टाकले असताना उरण तहसीलदार स्वत:हून अशा कोणत्याही कंटेनर यार्डवर कारवाई करण्यासाठी पुढाकार घेताना दिसत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी या अगोदर केला आहे.
आमच्याकडे कुणाची तक्रार नसल्याचे उत्तर देऊन नैसर्गिक पाणी निचऱ्याचे नालेच काढून टाकणाऱ्या अनेक कंटेनर यार्डना उरण तहसीलदार पाठीशी घालत असताना आता ग्रामपंचायतींनीही अनधिकृत कंटेनर यार्डच्या नळ व वीज जोडण्यांसाठी ना हरकत दाखले दिल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी उरण तहसीलदार, वन विभाग अधिकारी व ग्रामपंचायत कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची खातेनिहाय चौकशी करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.