बेकायदेशीर चिकन मटणाच्या दुकानावर कायदेशीर कारवाईसाठी संतोष काटे करणार बेमुदत उपोषण
उघड्यावरील चिकन मटणाच्या दुकानामुळे पसरत आहे रोगराई; प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष
विठ्ठल ममताबादे
उरण : नवी मुंबई विमानतळ क्षेत्रात विमानतळच्या बिंदूपासून १० किलोमीटर परीघात प्राण्यांची कत्तली करणे, त्याची कातडी वा अवशेष टाकणे, कचरा व इतर प्राणघातक पदार्थ टाकण्यास मनाई करण्यात आली आहे. कारण अनेक पशु पक्षी हे मांस, पदार्थ खातात, आजूबाजूच्या परिसरात अन्न शोधण्यासाठी येतात व विमान उडत असताना या पक्ष्यांचा विमानाला अपघात होतो व आगी लागणे किंवा इतर तांत्रिक बिघाड विमानात होतात. तसेच घातक पदार्थ, प्राण्यांची कत्तल, त्यांचे कुजलेले अवशेष यामुळे रोगराई पसरून विविध नवनवीन विषाणूचा जन्म होऊन विविध जीवघेणे आजार पसरतात, रोगाची लागण नागरिकांना होते म्हणून शासनाच्या एरोड्रेम पर्यावरण व्यवस्थापन समितीने विविध निर्बंध लादत १० किलोमीटर परिसरात प्राण्यांची कत्तल करू नये, अवशेष टाकू नये, कचरा करू नये असा निर्णय घेतला आहे. मात्र या नियमांची पायमल्ली विमानतळापासून १० किलोमीटर परिसराच्या आत असलेल्या उलवे शहरामध्ये दिसून येत आहे.
पनवेल तालुक्यातील उलवे हे शहर हे झपाट्याने विकसित होणारे शहर असून सिडकोने हे शहर वसविले आहे. स्वच्छ शहर, सुंदर शहर असा नारा देणाऱ्या पनवेल महानगर पालिका, सिडको प्रशासन व महाराष्ट्र शासनाचे आरोग्य विभागने या उलवे शहराकडे व उलवे शहरातील बेकायदेशीर व विना परवाना चिकन मटणाच्या दुकानाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने अनेक वर्षांपासून उलवे शहरात विविध भागात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली असून रोगराईचे साम्राज्य पसरले आहे. शासनाची कोणतेही परवानगी न घेता चिकन मटण विक्रेत्यांनी शाळा, कॉलेज, मंदिरे, चौक, महत्वाचे रस्ते, कॉर्नर रस्त्यावर तर कुठे गटारावर आपली दुकाने सुरु केली आहेत. त्यामुळे नागरिकांचे तसेच विविध पशु पक्ष्यांचेही अस्तित्व, जीवनमान, आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे अशा बेकायदेशीर चिकन मटण विक्रेत्यावर कारवाई करण्यात यावी यासाठी उलवेमधील सामाजिक कार्यकर्ते तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उलवे शहर अध्यक्ष संतोष काटे यांनी उलवेमध्ये ३ महिन्यापूर्वी आमरण उपोषण केले होते. तेव्हा सर्व चिकन मटण विक्रेत्यांनी संतोष काटे यांना प्रदूषण करणार नाही, कचरा करणार नाही, कोणाला त्रास होईल असे वागणार नाही असे आश्वासन दिले होते. मात्र, चिकन मटण विक्रेत्यांनी हे आश्वासन पाळले नसल्याने उलवे शहरामध्ये मोठया प्रमाणात दुर्गंधी पसरून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
उरण तालुक्यातील चिरनेर येथे असाच प्रकार घडला होता. चिकनच्या दुकानावर बर्ड फ्लूची लागण झालेले १२० हुन अधिक कोंबड्या मृत्यूमुखी पडल्या होत्या. तेव्हा या परिसरात नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते. जिल्हाधिकारी रायगड यांनी ते क्षेत्र तातडीने सील केले होते. तशीच अवस्था उलवे शहरामध्ये होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे काळजी घेणे, विविध उपाय योजना करणे हाच एकमेव पर्याय या समस्येवर आहे. या अनुषंगाने पर्यावरण संरक्षण, नागरिकांचे हित तसेच आरोग्य लक्षात घेता उलवे शहराला न्याय देण्यासाठी, उलवे शहर प्रदूषणमुक्त करण्यासाठी १९ फेब्रुवारी २०२५ पासून श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक, सेक्टर १९, उलवे शहर, पनवेल तालुका, जिल्हा रायगड येथे संतोष काटे हे आमरण अन्नत्याग उपोषण करणार आहेत. वेळोवेळी पत्रव्यवहार करून सुद्धा अनधिकृत चिकन मटण विक्रेत्यांवर कोणतेही कारवाई होत नसल्याने जनता, नागरिक, सामाजिक संस्था, पर्यावरण संस्था यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते संतोष काटे यांनीही शासनाच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली आहे.