रायगड : रायगड जिल्ह्यातील सुधागड आणि पेण तालुक्यात बुधवारी रात्री भूकंपाचे धक्के बसले. हा भूकंप सौम्य स्वरुपाचा असला तरी यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं याचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. भूकंपामागचं कारण आणि त्याचा केंद्रबिंदू याविषयीची माहिती समोर आलेली नाही. या भूकंपात जिवीतहानी किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, पेण आणि सुधागड तालुक्यातील काही भागात भूकंपाचे हादरे बसले. पेण तालुक्यामधील वरवणे, तिलोरे तर सुधागड तालुक्यातील भोपेची वाडी, देऊळ वाडी, कवेळी वाडी, महागाव या भागात जमिनीला हादरे बसले. भूकंपाचे धक्के बसल्यावर घाबरलेले नागरिक जीव वाचवण्यासाठी घरातून रस्त्यावर आले. त्यामुळे रस्त्यावर अचानक गर्दी झाली.
बुधवारी रात्री साडे दहाच्या सुमारास भूकंप झाला. पेण तहसीलदार तानाजी शेजाळ तसेच सुधागडचे तहसीलदार उत्तम कुंभार यांनी भूकंप झालेल्या गावांना भेट दिली. ग्रामस्थांसोबत चर्चा करुन त्यांना धीर दिला. या भूकंपात कोणत्याही प्रकारचे नुकसान झालेले नाही. या भूकंपाची हवामान विभागाच्या भूकंप मापन केंद्राच्या वेबसाईटवर याची नोंद नाही. जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया संस्थेला सर्वेक्षणाची विनंती केली जाणार आहे, अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक यांनी दिली आहे. नागरिकांनी घाबरु नये तसेच आवश्यक ती काळजी घ्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे. संबंधित यंत्रणा या सगळ्या परिस्थितीविषयीची माहिती गोळा करत आहे.
याआधी दिल्ली आणि आजुबाजूच्या काही भागांमध्ये भूकंप झाला होता. पण या भूकंपात कोणतेही नुकसान झालेले नाही.