नरेंद्र महाराजांचा एकेरी भाषेत उल्लेख केल्याने भक्तगण आक्रमक
विनायक पाटील
पेण : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांच्याविषयी केलेल्या अपमानास्पद वक्तव्यावरून विविध स्तरांतून त्यांच्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर पेण नगरपरिषदेच्या समोरील चौकात नरेंद्र महाराज यांचे शिष्य आणि अनुयायांनी विजय वडेट्टीवार यांच्या विरोधात जोरदार आंदोलन करून निषेध व्यक्त केला. जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज हे लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असून, त्यांच्या बद्दल अवमानकारक वक्तव्य केल्यामुळे अनुयायांमध्ये मोठा संताप पसरला आहे. या वक्तव्याचा निषेध करत संतप्त अनुयायांनी वडेट्टीवार यांनी तातडीने जाहीर माफी मागावी, अशी मागणी केली.

पेण नगरपरिषदेच्या समोरील चौकात झालेल्या या आंदोलनात मोठ्या संख्येने भक्तगण सहभागी झाले होते. परिसरात घोषणा देत फलक दाखवत विजय वडेट्टीवार यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. आंदोलनकर्त्यांनी वडेट्टीवार यांच्या वक्तव्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. अनेकांनी हातात पोस्टर आणि फलक घेत निषेध नोंदवला. पोस्टरला काळे फासण्यात आले व फोटोला जोडे मारण्यात आले. संतांच्या बाबतीत अशी वक्तव्ये करणे अयोग्य असून, त्यामुळे लाखो भक्तांच्या भावना दुखावल्या जातात, असे मत आंदोलकांनी व्यक्त केले. “संत हे समाजाच्या उन्नतीसाठी कार्य करतात, अशा पवित्र व्यक्तीबद्दल अनादराची भाषा वापरणाऱ्या माफी मिळणार नाही,” असे पेण तालुका अध्यक्ष किरण म्हात्रे, आकाश पाटील यांनी सांगितले.