अलिबाग तालुक्यातील कणकेश्वरसह जिल्ह्यात ५ ठिकाणी होणार रोप-वेची उभारणी
रायगड: राज्यातील दुर्गम गड, थंड हवेची ठिकाणे, उंचावरील देवस्थाने पाहणे आता आबालवृद्धांच्या आवाक्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या साथीने राज्य सरकारने राज्यात ४५ रोप-वे उभारण्यास मान्यता दिली असून, त्यातील कोकण विभागात ११, तर पुणे विभागात १९ रोप-वे उभारण्यात येतील. राष्ट्रीय राजमार्ग लॉजिस्टिक व्यवस्थापन लि. यांच्याबरोबरीने सार्वजनिक बांधकाम विभागाकडूनही या रोप-वेची उभारणी करण्यात येणार आहे.
राज्यात किल्ले रायगड येथे जाण्यासाठी असलेला रोप-वे तसेच विरारच्या जीवदानी मंदिर येथे जाण्यासाठी फनिक्युलरची उभारणी खासगी विकासकाच्या माध्यमातूनच करण्यात आली आहे. तर, नाशिकच्या सप्तश्रृंगीगड येथील फनिक्युलर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पीपीपी मॉडेलवर उभारण्यात आले आहे. हे चित्र बदलण्यासाठी केंद्राच्या राष्ट्रीय राजमार्ग लॉजिस्टिक व्यवस्थापन लि. (एनएचएलएमएल) आणि राज्य सरकारकडून पर्वतमाला परियोजनेअंतर्गत एकूण ४५ रोप-वेची कामे हाती घेण्यात आली आहेत. नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत त्याला मान्यताही देण्यात आली. राज्य सरकारकडून १६, तर ‘एनएचएलएमएल’कडून २९ रोप-वेची उभारणी करण्यात येणार आहे. यातील कोकण विभागात ११, तर पुणे विभागात १९ रोप-वे असतील.
रोप-वेची उभारणी करताना विविध पर्यायांचा वापर करण्यात येणार असून, त्यात ‘एनएचएलएमएल’ला राज्य सरकारने जागा उपलब्ध करून देणे, ‘एनएचएलएमएल’ला जागा उपलब्ध करून त्यात समभाग घेऊन महसूल मिळवणे, राज्य सरकारकडून खासगी-सार्वजनिक प्रकल्पाच्या आधारावर उभारणी करणे आणि बांधा-वापरा-हस्तांतरित करा या मार्गांचा अवलंब करण्यात येणार आहे.
प्रगतीपथावरील प्रकल्प
■ हाजीमलंग, कल्याण फनिक्युलर ट्रॉली सार्वजनिक बांधकाम विभाग (पीपीपी)
■ रेणुकामाता मंदिर, माहुरगड, नांदेड सा. बां. विभाग (सीआरआयएफ) प्रगतिपथावर
■ सिंहगड रोप-वे खासगी विकासक
■ जेजुरी रोप-वे – खासगी विकासक
प्रस्तावित प्रकल्प कोकण विभाग
■ रायगड किल्ला – सा. बां. विभाग
■ माथेरान – एमएमआरडीए
■ कणकेश्वर, अलिबाग – जिल्हा परिषद, रायगड
■ बाणकोट किल्ला, मंडणगड – एनएचएलएमएल
■ केशवराज (विष्णू) मंदिर, दापोली – एनएचएलएमएल
■ महादेवगड पॉइंट, सावंतवाडी – एनएचएलएमएल
■ माहुली गड, शहापूर – एनएचएलएमएल
■ सनसेट पॉइंट, जव्हार – एनएचएलएमएल
■ गोवा किल्ला, दापोली – एनएचएलएमएल
■ अलिबाग चौपाटी ते किल्ला – नगर परिषद,
■ अलिबाग घारापुरी, एलिफंटा लेणी – जिल्हा परिषद रायगड