रायगड : अलिबागमधील एकात्मिक बाल विकास योजनेच्या कार्यालयात देखील बनावट वेतन देयके बनवून ४ कोटी १२ लाखांचा अपहार झाल्याचा प्रकार उघड झाला आहे. रायगड जिल्हा परिषदमधील पाणी पुरवठा विभागात कोट्यावधी रुपयांचा अपहार झाल्याची घटना ताजी असतानाच अपहाराची आणखी एक घटना उघड झाल्याने खळबळ माजली आहे.
या प्रकरणी अलिबाग पोलिसांनी या प्रकणातील प्रमुख सूत्रधार नाना कोरडे याला अटक केली आहे. तर दोघे फरार आहेत. कोरडे याला २७फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. धुळे जिल्हा परिषदेत अनेक वर्षापूर्वी घडलेल्या घोटाळ्यातील प्रमुख आरोपी धर्मभास्कर वाघ अवतार रायगड जिल्हा परिषदेत निर्माण झाल्याची चर्चा आता रंगू लागली आहे.
कनिष्ठ सहाय्यक नाना एकनाथ कोरडे, ज्योतीराम पांडुरंग वरुडे, महेश गोपीनाथ मांडवकर या कर्मचाऱ्यांनी तब्बल ४ कोटी १२ लाख ३४ हजार ७७१ रुपयाच्या फरकाचे बनावट वेतन देयक तयार करून प्रकल्प अधिकारी यांची खोटी स्वाक्षरी करून अपहार केल्याचे प्रकरणी अलिबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, अलिबागमधील एकात्मिक बाल विकास योजनेच्या कार्यालयात वेतन देयक तयार करणाऱ्या तत्कालीन कर्मचाऱ्याने १ जानेवारी २०२० ते ३१ डिसेंबर २०२४ या कालावधीत कर्मचाऱ्यांच्या वेतन देयकामध्ये वाढीव वेतन म्हणून ४ कोटी, १२ लाख ३४ हजार ७७१ अशा फरकाचे बनावट वेतन देयक बनवून ती रक्कम बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्या नावे असलेल्या खाते क्रमांक२०३/३०५ मध्ये जमा असताना, प्रकल्प अधिकारी यांच्या खोट्या सह्या बैंक चलनावर करुन ती रक्कम स्वतःच्या आणि इतर अशासकीय इसमांच्या खात्यावर घेऊन अपहार केला.
ही बाब निदर्शनास आल्या नंतर नाना कोरडे याने त्यापैकी २ कोटी २३ लाख ५० हजार ६०० इतकी रकम खाते क्रमांक २०३/३०५ मध्ये पुन्हा जमा केली. दरम्यान शासनाची फसवणूक करणाऱ्या संबंधित आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून २३ फेब्रुवारी रोजी रात्री नाना कोरडे यास अटक करण्यात आली आहे. उर्वरित दोघेजण फरार असल्याचे पोलीस निरीक्षक किशोर साळे ह्यांनी सांगितले अधिक तपास सुरू आहे. या प्रकारामुळे रायगड जि.प. वर्तुळात एकच खळबळ माजली आहे. सध्या येथे प्रशासकीय राजवट लागू आहे.