• Sun. Jun 22nd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

यश मिळवताना आपल्या कुटुंबासह विभागाचा आणि समाजाचा नावलौकिक साधावा -अरुण मांजरेकर

ByEditor

Jul 30, 2023

श्रीवर्धन भंडारी समाज पंचतन विभागाच्यावतीने ज्येष्ठ नागरिक सन्मान व विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न

अभय पाटील
बोर्ली पंचतन :
आताचे विद्यार्थी हे पुढील उज्वल भारताचे भावी नागरिक आहेत, आपल्या शैक्षणिक वाटचालीमध्ये घवघवीत यश मिळवताना आपल्या कुटुंबाचा, विभागाचा आणि समाजाचा नावलौकिक साधावा, आजचा होत असलेला गौरव म्हणजे आपल्या पाठीवर समाजाची कौतुकाची थाप आहे व पुढेही कौतुकाची थाप आपणास नक्कीच प्रेरणादायी ठरो असे वक्तव्य पंचतन विभाग भंडारी समाज संघटना श्रीवर्धन अध्यक्ष अरुण मांजरेकर यांनी केले. समाजाच्या ११ गावांतील ज्येष्ठ नागरिक सन्मान व विद्यार्थी गुणगौरव सोहळ्या प्रसंगी ते बोलत होते.

श्रीवर्धन तालुक्यातील पंचतन विभाग भंडारी समाजाच्या दिघी, आदगाव, वेळास, वडवली, बोर्ली पंचतन, दिवेआगर, शेखाडी, कोंडविली, आरावी, वाळवटी, महालक्ष्मी दांडा या ११ गावांतील ज्येष्ठ नागरिक ज्यांनी समाजाच्या प्रगती उन्नतीसाठी हातभार लावला अशा नागरिकांचा सन्मान तसेच सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षामध्ये इयत्ता १०वी, १२वी, पदविका, पदवी, पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा दिवेआगर येथील कै. सखाराम शिवराम शिलकर सभागृह येथे संपन्न झाला. या कार्यक्रमास तालुका भंडारी समाजाचे प्रभारी अध्यक्ष नरेश बोरकर, पदाधिकारी विठोबा देवकर, संस्थापक पांडुरंग तोडणकर, पंचतन विभाग समितीचे अध्यक्ष अरुण मांजरेकर, कार्याध्यक्ष महेश पिळणकर, सचिव शंकर मयेकर, सहसचिव देवेन्द्र नार्वेकर, खजिनदार चंद्रशेखर मोरे, सहखजिनदार अभय परकर सर्व सदस्य सल्लागार, सर्व गावांतील भंडारी समाज अध्यक्ष पदाधिकारी, समाज बांधव, विद्यार्थी, मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी ज्येष्ठ समाजबांधवांना तसेच विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक समाज संघटनेचे संस्थापक पांडुरंग तोडणकर यांनी करताना सांगितले की, समाज एकसंघ, एक विचाराने रहावा यासाठी आम्ही नेहमीच समाजाच्या सोबत राहू समाजाची देखणी वास्तु उभी रहाण्यासाठी देखील सहकार्याची भावना असेल व समाजाच्या हितासाठी नेहमीच अग्रेसर राहताना विविध समाजोपयोगी कार्यक्रम होत राहतील असे आश्वस्त केले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन अमित पाटील, हेमंत किर, विशाल पिळकणर यांनी केले.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!