• Sun. Jun 22nd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

अटल करंडकाचा मानकरी ठरला आई रायबादेवी रावे संघ

ByEditor

Feb 25, 2025

आयोजकांनी मानले वैकुंठ पाटील यांचे आभार

विनायक पाटील
पेण :
शिवजयंतीचे औचित्य साधून गावदेवी जोहे व वैकुंठदादा पाटील मित्र मंडळाकडून अटल करंडक २०२५ प्रकाश झोतातील क्रिकेट सामन्यांचे आयोजन जोहे येथील जय गीरोबा मैदानावर करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन खासदार धैर्यशील पाटील व भाजपचे युवा नेते वैकुंठ पाटील यांच्या हस्ते करण्यात आले होते. या भव्य दिव्य आणि क्रिकेटचा महासंग्राम समजल्या जाणाऱ्या अटल करंडक स्पर्धेमध्ये अंतिम सामन्यात दीव संघाला पराभूत करीत आई रायबादेवी रावे संघाने प्रथम क्रमांक पटकावत अटल करंडकावर आपले नाव कोरले. या संघाला मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम एक लाख रुपये व भव्य दिव्य चषक देऊन सन्मानित करण्यात आले. द्वितीय क्रमांक दीव संघाने पटकावले त्यांना रोख रक्कम 50,000 व भव्य चषक देण्यात आले. तृतीय क्रमांक आवरे, चतुर्थ क्रमांक दारावे, पाचवा क्रमांक जाणता राजा दादर बी, सहावा क्रमांक जितू आई जिते, सातवा क्रमांक जितू आई जिते बी या संघाने पटकावले असून त्यांना रोख रक्कम व चषक देऊन सन्मानित करण्यात आले.

या प्रकाश झोतातील सामन्यांमध्ये आई रायबादेवी रावे संघाच्या ओमकार पाटील यांनी षटकार चौकारांची आतिषबाजी करत व उत्कृष्ट गोलंदाजी करून आपल्या संघाला अंतिम फेरीपर्यंत मजल मारून देऊन सर्वात जास्त धावांचा पल्ला गाठत मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरला असून मान्यवरांच्या हस्ते त्याला फ्रिज देऊन गौरविण्यात आले.

हमरापूर विभागात प्रथमच प्रकाश झोतातील क्रिकेट सामन्यांचे भव्य दिव्य असे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी जोहे गावातील बाळगुड्डू यांचे खूप मोठे योगदान लाभले. या प्रकाश झोतातील अटल करंडक स्पर्धेचे सर्वेसर्वा भाजपचे युवा नेते वैकुंठ पाटील यांचे आयोजकांसह क्रिकेट रसिकांनी मनापासून आभार मानले. वैकुंठ पाटील हे तरुणांच्या गळ्यातील ताईत बनले आहेत. प्रत्येकाच्या मुखातून वैकुंठ पाटील यांचे नाव आवर्जून घेतले जात आहे. कला, क्रीडा, सांस्कृतिक व सामाजिक कार्यात वैकुंठ पाटील यांचा मोठा हातभार लागत असल्याच्या भावना क्रिकेटप्रेमी व नागरिक व्यक्त करत आहेत.

अटल करंडक प्रकाश झोतातील स्पर्धेचे बक्षीस वितरण आदिनाथ पाटील व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेला उद्घाटनासह बक्षीस वितरण कार्यक्रमापर्यंत अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. हमरापुर विभागात प्रथमच प्रकाश झोतातील स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याने दररोज हजारोच्या संख्येने क्रिकेटप्रेमी उपस्थित राहून या स्पर्धेचा आनंद लुटत होते. या स्पर्धेची चर्चा पेण तालुक्यासह संपूर्ण रायगड जिल्ह्यात होत आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!