म्युनिसिपल एम्प्लॉइज युनियनकडून उरणमधील पत्रकारांचा सन्मान
अनंत नारंगीकर
उरण : उरण नगर पालिकेतील म्युनिसिपल एम्प्लॉइज युनियन या कामगार संघटनेच्यावतीने उरण तालुक्यातील पत्रकारांना कर्तव्य दक्ष पत्रकार पुरस्कार देऊन युनियनचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते अँड सुरेश ठाकूर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी तालुक्यातील प्रत्येक पत्रकारांना एक फुल झाड देण्यात आले.
म्युनिसिपल एम्प्लॉइज युनियन यांच्या वतीने उरण नगर पालिकेच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी युनियनचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते अँड सुरेश ठाकूर होते. सामाजिक कार्यकर्ते तथा युनियनचे कार्याध्यक्ष संतोष पवार, सरचिटणीस अनिल जाधव,उरण युनिटचे अध्यक्ष रमेश कांबळे, कार्याध्यक्ष मधुकर भोईर, सचिव नरेंद्र उभारे, हरेश जाधव, जेष्ठ पत्रकार प्रदिप पाटील, जेष्ठ पत्रकार प्रविण पुरो आदींसह इतर मान्यवर व्यासपिठावर उपस्थित होते. यावेळी नगर पालिकेतील कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कामगारांच्या समस्यांसंदर्भात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ॲड. सुरेश ठाकूर, अनिल जाधव, संतोष पवार, तसेच जेष्ठ पत्रकार प्रदिप पाटील, प्रविण पुरो, पत्रकार संघाचे अध्यक्ष घनश्याम कडू, आवाज महामुंबई चॅनेलचे संपादक मिलिंद खारपाटील यांच्यासह इतर तालुक्यातील पत्रकारांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना ॲड. सुरेश ठाकूर म्हणाले, पत्रकार हे वर्तमान पत्राच्या माध्यमतून समाजाला विधायक दिशेने घेऊन जाण्याचे काम करत असतात.त्या पत्रकारांना शासनाने मानधन देणे गरजेचे आहे.
युनियनचे कार्याध्यक्ष संतोष पवार म्हणाले की, म्युनिसिपल एम्प्लॉइज युनियनमधील कामगारांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी व शासनस्तरावर पोहोचविण्याचे महत्वपूर्ण काम पत्रकारांच्या माध्यमतून होत असते. यावेळी जेष्ठ पत्रकार प्रदिप पाटील, जेष्ठ पत्रकार प्रविण पुरो यांनीही आपले विचार व्यक्त करत म्युनिसिपल एम्प्लॉइज युनियनच्या पदाधिकारी व कामगार बंधूंचे आभार मानले.