नवी मुंबईतील उलवे नोडमधील घटना
नवी मुंबई : सततच्या भांडणाला कंटाळून पत्नीनं पतीचा आपला मुलगा आणि मित्राच्या मदतीनं खून केल्याचा धक्कादायक प्रकार नवी मुंबईतील उलवे परिसरात घडला आहे. पतीच्या खून केल्याची कबूली पत्नीनं दिली आहे. याप्रकरणी पत्नीसह तिघांना अटक केली असून मुलाला अल्पवयीन असल्यानं त्याला बाल न्यायालयात हजर केलं आहे.
23 फेब्रुवारीला एका व्यक्तीचा मृतदेह सकाळी साडेआठच्या दरम्यान वहाळ ब्रिज खाडी परिसरात आढळला. पोलीस संबंधित मृतदेहाची ओळख पटवत असताना उलवे पोलीस ठाण्यात आपला पती सचिन मोरे (35) हरवल्याची तक्रार देण्यासाठी मृताची पत्नी रेश्मा मोरे (३२) गेली होती. तेव्हा उलवे पोलिसांनी संबंधित अनोळखी मृतदेहाचा फोटो दाखवला असता, रेशमानं हा मृतदेह तिच्या पतीचा असल्याचं सांगितलं. पोलिसांनी रेश्मा हिच्याकडं चौकशी केली असता, तिची उत्तरं अत्यंत वेगळ्या पद्धतीची आणि असमाधानकारक होती. याशिवाय तिची वागणूक संशयास्पद होती. त्यामुळं पोलिसांनी रेश्मा राहतं असलेल्या बिल्डिंगचे सीसीटीव्ही फुटेज आणि सीडीआर रेकॉर्ड देखील काढले. तसंच शविच्छेदनात तिच्या पतीचा खून झाल्याचा स्पष्ट झालं.
रेश्माची वागणूक पाहता, पोलिसांचा रेश्मा संदर्भात संशय बळावला. पोलिसांनी चौकशी केली असता, रेश्माला तिचा पती सचिन मोरे अत्यंत त्रास देत होता. भांडण करून मारहाण देखील करायचा. आपले पटत नाही, त्यामुळं आपण घटस्फोट घेऊ असं म्हणत पतीकडं घटस्फोट मागितला. मात्र, त्यानं घटस्फोट देण्यास नकार दिला. रोज रोज पतीच्या त्रासाला कंटाळल्यामुळं रेशमानं सचिनचा काटा काढायचं ठरवलं. त्यासाठी तिनं मित्र रोहित टेमकर याची मदत घेतली. या कटात रोहितनं या कटात आग्रोळी इथल्या रिक्षा चालक प्रथमेश म्हात्रे यालाही घेतलं. तसंच रेश्माचा अल्पवयीन मुलगा देखील सहभागी होता. याप्रकरणी रेश्मा सचिन मोरे (३२), प्रथमेश म्हात्रे रिक्षा चालक (२८), रोहित टेमकर (३४) या तिघांना अटक करण्यात आली असून, रेश्माचा मुलगा याला अल्पवयीन असल्यानें त्याला बाल न्यायालयात हजर केलं आहे.