घन:श्याम कडू
उरण : उरण शहरात दिवसेंदिवस वाढत असलेल्या समस्या व प्रशासनाच्या अपयशाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे नगरपालिकेवर धडक दिली जाणार आहे.
उरण शहरातील नागरी समस्या, मूलभूत सुविधांतील त्रुटी, प्रशासनाचा दिरंगाईपणा याविरोधात शिवसेनेने आवाज उठवण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हाप्रमुख व माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवार, ३ मार्च २०२५ रोजी सकाळी ११ वाजता उरण नगरपालिकेवर मोर्चा काढण्यात येणार आहे. या आंदोलनात तालुक्यातील व शहरातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सर्व आजी-माजी पदाधिकारी, नगरसेवक, नगरसेविका, महिला आघाडी पदाधिकारी, युवासेना, अंगीकृत संघटना, जेष्ठ-श्रेष्ठ कार्यकर्ते तसेच शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. शहरातील नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी होणाऱ्या या आंदोलनाकडे संपूर्ण उरणवासीयांचे लक्ष लागले आहे.