वनसंपदेची प्रचंड हानी; प्रांताधिकारी, तहसीलदार घटनास्थळी
विश्वास निकम
कोलाड : रोहा तालुक्यातील धामणसई ग्रामपंचायत हद्दीतील डोंगरमाथ्यावर असलेल्या इंदरदेव धनगरवाडी येथे अचानक डोंगराला वणवा लागल्याने सदरच्या वणव्याने रौद्ररूप धारण केल्याने वस्तीतील ४८ घरे या वणव्यात जळून खाक झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मात्र, सदर घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, परंतु आगीत घरांचे खूप मोठे नुकसान झाले आहे. त्याच बरोबर वनसंपदेची देखील प्रचंड हानी झाली असून धनगरवाडीवरील ग्रामस्थांचे जनजीवन विस्कळीत झाले. रोह्याचे प्रांत अधिकारी यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी करीत ग्रामस्थांना धीर दिला.

वन विभागाचा हलगर्जीपणा अखेर वाडीवर ग्रामस्थांच्या घरांवर बेतला. डोंगर माथ्यावर असलेल्या इंदरदेव धनगरवाडी येथील डोंगराला गुरुवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास अचानक वणवा लागण्याची घटना घडली. वणव्याने काही क्षणातच रौद्ररूप धारण केले आणि इंदरदेव येथील घरांच्या वस्तीत पेटता वणवा शिरल्याने येथील संपूर्ण घरे या वणव्यात जळून खाक झाली. जीवनावश्य वस्तू आणि महत्वाचे सामानाची राख रांगोळी झाल्याने ग्रामस्थांवर मोठे संकट ओढवले आहे. वणव्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी व बचाव कार्य करण्यासाठी कोलाड येथील SVRSS टीम, धाटाव येथील दीपक नायट्रेट कंपनी येथील अग्निशमन दल, वनविभाग, सामाजिक संस्था, पंचायत हद्दीतील ग्रामस्थ युवक यांनी तत्काळ धाव घेत प्रसंगावधान राखत शर्थीचे प्रयत्न करत या वणव्यावर नियंत्रण मिळविले. मात्र या घटनेत कोणतीही जीवितहानी घडली नसून घरांचे तसेच घरात असलेल्या जीवनावश्यक वस्तूंचे जळून खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

घटनेची माहिती मिळताच क्षणाचाही विलंब न करता रोहा प्रांत अधिकारी ज्ञानेश्वर खुटवड, तहसीलदार किशोर देशमुख, तलाठी, ग्रामसेवक, माजी आमदार अनिकेत तटकरे यांचे स्वीय सहाय्यक उमेश लोखंडे यांनी घटनास्थळी धाव घेत येथील ग्रामस्थांना धीर दिला, तर तात्काळ नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश संबंधित अधिकारी यांना प्रांत अधिकारी यांनी देत रात्री उशिरापर्यंत जीवनावश्य वस्तूंची मदत करण्यासाठी अथक प्रयत्न सुरू करत रातोरात वाडीवर राहणाऱ्या कुटुंबाची त्यांची घरांचे घरपट्टीवरील असेटमेंट ग्रामसेवक अधिकारी यांच्याकडून स्वतः प्रांत अधिकारी, तहसीलदार, त्यांचे कार्यालय कर्मचारी, तटकरे यांचे स्वीय सहाय्यक उमेश लोखंडे, स्थानिक सरपंच, सदस्य, ग्रामस्थ यांनी ग्रामपंचायत कार्यालयात बसून एकूण आढावा घेऊन पुढील पीडितांना न्याय मिळावा यासाठी प्रयत्नशिल असल्याचे दिसून आले.

हातावर मोल मजुरी करून दूध दही तसेच दुग्ध व्यवसाय करत पोट भरणारे येथील वाडीवरील ग्रामस्थ डोंगर माथ्यावर पुरेसे पाणी उपलब्ध नसल्याने उन्हाळी दिवसात उदार निर्वाह करण्यासाठी डोंगर माथ्यावर न राहता ते डोंगर पायथ्याशी तसेच जिथे मिळेल तिथे आपली गुरे ढोरे घेऊन कुटुंबासहीत निवारा घेतात. तर चार पाच कुटुंब हे मोल मजुरीसाठी बाहेर असल्याने थोडक्यात बचावल्याचे समजते. मात्र डोंगरात दिवसेंदिवस वणवा लागण्याच्या प्रमाणात भयानक वाढ झाली असून यावर वन विभाग काय उपाययोजना करणार याकडे लक्ष लागले आहे. मात्र वणव्यात वनसंपदेचे होणाऱ्या हानीला जबाबदार कोण यावर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

खराब रस्ता, दगड गोटे मातीचा कच्चा रस्ता त्यातून बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. त्या पाठपाठ प्रांत अधिकारी देखील वाहनातून आणि काही प्रवास पायी करत रात्री उशिरापर्यंत घटनास्थळी धाव घेत पोहचले. येथील ग्रामस्थांची भेट घेत पाहणी करून त्यांना धीर दिला तर वनविभागाच्या हलगर्जीपणामुळे अखेर येथील ४८ कुटुंब बेघर झाली. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. डोंगर दऱ्या खोऱ्यात राहत असल्याने त्यांना आपत्कालीन वणव्यावर उपाययोजना करणाऱ्या साधन साहित्यांचे वाटप केलेले साहित्य देखील त्यांच्याकडून माघारी घेतल्याचे समजते. यावर देखील आता मोठा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या परिसरात मागील चार पाच दिवस वणवा लागत असल्याचे वनखात्याच्या निदर्शनात असून देखील त्याकडे काणाडोळा केल्याने हे भले मोठे संकट या ग्रामस्थांवर ओढवले असल्याचे दिसून येत आहे. तर भयानक लागलेल्या वनव्याने रुद्ररूप धारण करून ग्रामस्थांची घरे जळून खाक झाली मात्र त्यांना शासनाकडून पुन्हा त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी मदतीची मागणी केली जात आहे.
