घन:श्याम कडू
उरण : उरण शहरात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्यावतीने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते भैय्याजी जोशी यांनी मराठी भाषेबद्दल केलेल्या वक्तव्याच्या विरोधात शुक्रवार, दि. ७ मार्च रोजी तीव्र निषेध नोंदवण्यात आला. शिवसेना उरण शहर शाखेजवळ रायगड जिल्हाप्रमुख आणि माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने करण्यात आली.
यावेळी भैय्याजी जोशी यांच्या विरोधात घोषणाबाजी करत त्यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. माजी आमदार मनोहरशेठ भोईर आणि उपजिल्हाप्रमुख नरेश रहाळकर यांनी आपल्या भाषणात आरएसएसच्या नेत्यांवर टीका करत, “मुंबईत मराठी भाषाच बोलली जाईल आणि विभाग वाईज भाषा विभागणी आम्ही खपवून घेणार नाही” असे ठणकावून सांगितले.
या निदर्शनांमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अनेक प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यामध्ये उरण तालुकाप्रमुख संतोष ठाकूर, माजी नगराध्यक्ष गणेश शिंदे, तालुका संपर्कप्रमुख दीपक भोईर, शहर संपर्कप्रमुख गणेश म्हात्रे, शहर संघटक दिलीप रहाळकर, तसेच नगरसेवक, युवासेना पदाधिकारी आणि महिला पदाधिकारी यांचा सहभाग होता.
या आंदोलनाच्या माध्यमातून उरणमध्ये शिवसेनेने मराठी अस्मितेचा जोरदार आवाज उठवला आणि मराठी भाषेच्या संरक्षणासाठी कटिबद्ध असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट केले.
