विठ्ठल ममताबादे
उरण : १२ जानेवारी २०२४ रोजी उरण-नेरूळ उरण -बेलापूर रेल्वेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी हिरवा झेंडा दाखवला होता, पंतप्रधानांच्या हस्ते या रेल्वे सेवेचे उद्घाटन करण्यात आले होते .आणि तेव्हापासून उरण-नेरूळ, उरण-बेलापूर मार्गे रेल्वे सेवा रुजू झाली. रोज हजारो प्रवासी नागरिक, विद्यार्थी, नोकरदार ,व्यावसायिक ,ज्येष्ठ नागरिक या सेवेचा लाभ घेत आहेत प्रवाशांची गर्दी तर दिवसेंदिवस वाढतच आहे. पण रेल्वे फेऱ्यांमध्ये काही वाढ होत नाही. अजूनही उरण-सीएसएमटी उरण-ठाणे या मार्गावर रेल्वे सेवा उपलब्ध नाही.

उरणवासियांच्या प्रवासी रेल्वे फेरीमध्ये वाढ होत नाही हि गैरसोय तर आहेच, पण उरणच्या प्रवाशांच्या नशिबी नादुरुस्त रेल्वे मिळत आहेत. दिनांक ६ जानेवारी रोजी ३.४५ ला नेरूळ हुन सुटणारी नेरूळ उरण हि लोकल सेवा मध्येच बंद पडली होती. तेव्हा प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला होता. जीव मुठीत घेऊन रेल्वे ट्रॅकवरुन प्रवासी चालत होते. तेव्हाही रेल्वे बंद पडली होती आणि महिला, विद्यार्थी, जेष्ठ नागरिक यांचे हाल झाले होते.

“पुन्हा येरे माझ्या मागल्या”
दिनांक ११ मार्च रोजी याच घटनेची पुनरावृत्ती झाली. ५.३५ ला सुटणारी ट्रेन रेतीबंदर येथे सागरी पुलावर बंद पडून प्रवाशांना रेल्वे ट्रॅकवरुन चालावे लागले. त्यानंतर हि रेल्वे सेवा बंद झाल्याने मार्ग एकच असल्याने यापुढील नेरूळ आणि बेलापूर दोन्ही मार्गावरील येणाऱ्या रेल्वे आल्याच नाही. उरणकरांना बंद पडणाऱ्या एनएमएमटी या तर पाचवीलाच पुजलेल्या आहेत आणि आता बंद पडलेल्या ट्रेन पाठवून उरणकरांचे कोणते प्रवासी हित साधायचे आहे? तसेच रेल्वेच्या अशा हलगर्जीपणामुळे प्रवाशांचे प्राण धोक्यात असल्याने प्रवासी वर्गाकडून संताप व्यक्त होत आहे.

