अनंत नारंगीकर
उरण : भेंडखळ गावाशेजारील तलावात बुडून तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (दि. १४) दुपारी साडेतीन ते चारच्या सुमारास घडली. घनश्याम जयस्वाल असे मृताचे नाव असून तो लखनोल येथील रहिवासी असल्याचे समजते. सदर घटनेची माहिती उरण पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार द्रोणागिरी नोड परिसरातील भेंडखळ ग्रामपंचायत हद्दीतील तलावात शुक्रवारी (दि. १४) घनश्याम जयस्वाल हा तरुण धुळवडीच्या दिवशी अंघोळ करण्यासाठी गेला होता. तलावातील पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा बुडून मुत्यू झाल्याची माहिती सूत्रांकडून समजते. हा तरुण भारत गॅस या प्रकल्पात येणाऱ्या वाहनांवर चालक म्हणून काम करीत होता. या घटनेची माहिती उरण पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामे सुरू केले आहेत. भेंडखळ गावाला लागूनच असलेल्या तलावात बाहेरून येणारे वाहन चालक हे नेहमी अंघोळ करण्यासाठी जात असतात अशी माहिती गावकऱ्यांकडून सांगण्यात येते.
