ठेकेदार बदलला तरीही माणगाव व इंदापूर बायपासच्या कामाचा तिढा कायम
सलीम शेख
माणगाव : कोकणासह दक्षिणेला जोडणारा विकासाचा मार्ग म्हणून मुंबई-गोवा महामार्गाकडे पहिले जाते. या मार्गाच्या कामाची गेली पंधरा वर्षापासून चांगलीच रखडपट्टी सुरु असून प्रवासी पर्यटकांना वनवास भोगावा लागत आहे. माणगाव व इंदापूर शहराला बायपास दिला गेल्याने तळ कोकणासह गोवा व दक्षिणेकडील पर्यटकांना अंतर कमी झाल्याने कोकण व गोवादर्शन सहज घडवता येईल अशी आशा पर्यटकांना वाटत होती मात्र या बायपासचे काम यापूर्वी वनखाते व रेल्वे खात्याच्या मंजुरीत अडकल्याने बायपास कामाचे तीन तेरा वाजले होते. त्यानंतर वनखात्याची मंजुरी मिळाली. मात्र निधी अपुरा पडत असल्याने व शासनाकडून वेळेवर निधी मिळत नसल्याचे कारण पुढे करीत पूर्वीच्या ठेकेदाराने हे काम सोडून दिले. त्यानंतर सनी इंटरप्रायजेस कंपनीकडे हे काम दिले. त्यानंतर ही बायपासचे काम व रुंदीकरणाचे कामात म्हणावी तितकी गती मिळत नसल्याने पुन्हा नव्याने तिसऱ्या ठेकेदाराला काम दिले आहे. त्यानंतरही माणगाव व इंदापूर बायपासच्या कामाचा तिढा आजही कायमच राहिला आहे.
माणगाव व इंदापूर बायपासचे काम रखडल्याने दरम्यानच्या भागात वाहतूक कोंडी सतत होत असल्याने प्रवासी नागरिकांची चांगलीच रखडपट्टी होत आहे. तळ कोकणासह गोव्याकडे जाणाऱ्या नागरिकांना माणगाव बाजारपेठेत अडथळा होऊ नये म्हणून माणगावच्या बाहेरून शहराला बायपास रस्ता मंजूर केला असून या बायपास मार्गाचे काम गेली दहा वर्षापासून थांबले आहे. हा बायपास रस्ता वनखात्याच्या जमिनीतून व कोकण रेल्वेला उड्डाण पूल होत असल्याने इंदापूर आणि माणगाव येथील दोन्ही शहरा लगतचे बायपासचे काम रखडले जात आहे. त्यातच वैयक्तिक मालकी जमीनीच्या कांही मालकाना भूसंपादनाच्या मोबदल्याचा प्रश्नही भेडसावत आहे. त्यामुळे बायपासचे काम रखडले आहे. केंद्रीय रस्ते, वाहतूक महामार्ग मंत्री यांनी ३ एप्रिल २०२२ रोजी इंदापूर येथील कार्यक्रमात मुंबई-गोवा महामार्गाच्या रस्त्याचे काम एक वर्षात पूर्ण करू अशी ग्वाही दिली होती. त्यानंतर विविध सार्वजनिक बांधकाम मंत्री तसेच तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही विधानसभा निवडणुकीपूर्वी महामार्गाची पाहणी करून बायपास व महामार्गाच्या कामाला गती देवून नजीकच्या काळात महामार्गाचे काम पूर्ण करू अशी ग्वाही दिली होती. हि आश्वासने फोल ठरल्याने नुकतीच महामार्गावर आंदोलन करून आंदोलन कर्त्यांनी शिमगा साजरा केला.
माणगाव कळमजे पुलाजवळून नाणोरे गावालगत या बायपास रस्त्याचे काम २०१७ मध्ये सुरु झाले. हे काम ३० टक्के करण्यात आले होते. हा बायपास रस्ता सात कि.मी. चा असून तो माणगाव शहरा बाहेरून काढण्यात आला आहे. माणगावात वाहतुकीचा ताण पडत असून वारंवार वाहतूक कोंडीशी सामना पर्यटक नागरिकांना करावा लागत आहे. मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरणाचे कामाचे गेली अनेक दिवस घोंगडे भिजत पडले आहे. त्यामुळे प्रवाशी, पर्यटक, नागरिकांत कमालीची नारीजी पसरली आहे. अखेर शासनावर दबाव वाढत असल्याने या रुंदीकरणाच्या कामाची गाडी धीम्या गतीने का होईना सुरु असून त्या कामाला आणखीन म्हणावी तितकी गती मिळत नाही. कोकणच्या विकासाला अडथळा निर्माण करणाऱ्या महामार्गाचे रुंदीकरण हे महत्वाचे असून कोकणचे मुख्य प्रवेशद्वार समजले जाणाऱ्या इंदापूर व माणगाव या महत्वाच्या शहराजवळून जाणाऱ्या बायपास रस्त्याच्या कामाचे तीन-तेरा वाजल्याने कोकणवासीयातून प्रचंड नाराजी प्रसरली आहे.

