अनंत नारंगीकर
उरण : उरण शहराच्या काही ठिकाणी पाण्याचा गैरवापर होत आहे. राज्यात लोकांना पाण्यासाठी दाही दिशा भटकावे लागते, पण उरण शहरात पाण्याची नासाडी होताना दिसते. याकडे उरण नगरपरिषदेने लक्ष देण्याची गरज आहे. शहरातील पेन्शन पार्क या शासकीय भूखंडावर उभारण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामावरील व्यावसायिक पिण्याचे पाणी गाडी धुण्यासाठी वापरतात. तरी उरण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी समिर जाधव यांनी तातडीने कारवाईचे आदेश द्यावेत अशी मागणी रहिवाशी व्यक्त करत आहेत.
आजही प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ग्रामीण भागातील लोकांना कित्येक मैल जाऊन पाणी आणावे लागते. शहरी भागात पाईपलाईन फुटून हजारो लिटर पाणी वाया जात असते. याकडे मात्र दुर्लक्ष होते. पाणी कसे उपयोगात आणता येईल, याचा विचार व्हावा. पाण्याचा वापर जपूनच करावा. पाणी जीवन आहे. पाणी जपून वापरल्यास येणाऱ्या काळात पाण्याची टंचाई उद्भवणार नाही. अशा प्रकारच्या जाहिराती हजारो रुपये खर्च करून नगरपरिषद, महानगरपालिका, शासन करत आहेत. मात्र त्याची अंमलबजावणी प्रत्यक्षात अंमलात आणली जाते की नाही याचा आढावा घेतला जात नाही. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची नासाडी ही सर्रास केली जात आहे. त्याचे जिवंत उदाहरण हे उरण नगरपरिषदेच्या हद्दीत आजही पाहायला मिळत आहे.
उरण नगरपरिषद हद्दीत परप्रांतीय नागरिकांची दहशत माजली आहे. आज स्थानिक रहिवाशांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असताना शासकीय भूखंडावर अनाधिकृत व्यवसाय करणारे परप्रांतीय नागरिक पाण्याची नासाडी करताना दिसत आहेत. पिण्याच्या पाण्याचा वापर सर्रास आपल्या गाड्या धुण्यासाठी करत असतील तर त्या व्यक्तीवर कठोर कारवाई करावी
-सुप्रिया पाठारे
उरण शहर
| या घटनेसंदर्भात उरण नगर परिषदेकडे विचारणा केली असता त्यांनी बोलण्यास नकार दर्शविला आहे. कारण पेन्शन पार्क या शासकीय भूखंडावरील ज्या टपऱ्या, दुकाने आहेत ती बहुतांश उरण नगरपरिषदेच्या कर्मचारी वर्गाची असून ती सध्या परप्रांतीय नागरिकांना भाड्याने देण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. |
