अनंत नारंगीकर
उरण : तालुक्यातील अनेक भागात नाईट क्रिकेट सामन्याचे आयोजन हे काही व्यक्तींनी गाव पुढारी, पोलीस यंत्रणा यांना हाताशी धरून काही दिवसांपासून सुरू केले आहेत. त्याचा त्रास हा रहिवाशांना होत आहे. यावर कारवाई केली जात नसल्याने त्याचा फायदा हा चक्री जुगार व्यवसायिकांनी उठविला असून या ठिकाणी सर्रासपणे अंमली पदार्थांची विक्री केली जात आहे. त्यामुळे गावातील सामाजिक वातावरण बिघडून तरुण व्यसनाच्या मार्गावर ओढला जात आहे. तरी राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष देण्याची गरज असल्याचे मत स्थानिक रहिवासी व्यक्त करत आहेत.
शहरी भागात चालणाऱ्या क्रिकेट सामन्याचे तसेच अंमली पदार्थांचे लोण आता तालुक्याच्या ग्रामीण भागातही पोहोचू लागले आहे. ग्रामिण भागात दर दिवशी कोणत्या ना कोणत्या गावात गाव पुढारी व पोलीस यंत्रणा यांच्या देखरेखीखाली सर्रास नाईट क्रिकेट सामन्यांचे आयोजन केले जात आहे. या नाईट क्रिकेट सामन्यात चक्री जुगारही मोठ्या प्रमाणात खेळला जात असल्याने दररोज लाखांची उलाढाल होत असून अड्डा चालकाला मोठ्या प्रमाणात पैसे मिळत आहेत. त्यातच ग्रामिण भागातील तरुण पिढीही चक्री जुगार खेळण्याबरोबर या ठिकाणी उपलब्ध होणाऱ्या अंमली पदार्थांच्या विळख्यात सापडत असल्याच भयानक चित्र समोर येत आहे. या चक्री जुगार अड्ड्यामुळे व अंमली पदार्थांच्या सेवनाने परिसरातील अनेक तरुणांचे कुटुंब उध्वस्त होण्याची शक्यता आहे. एकंदरीत असे असताना नवी मुंबई पोलीस आयुक्तालय या गंभीर घटनेकडे लक्ष केंद्रित करत नसल्याने ग्रामस्थांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
कारवाई करण्यास टाळाटाळ
डिसेंबर महिन्यापासून नाईट क्रिकेट सामन्यांच्या ठिकाणी चक्री जुगार अड्डा सुरू झाल्यापासून अनेकजण जुगारामध्ये हजारो रुपये हरले आहेत. हा चक्री जुगार अड्डा सुरू राहिल्यास जुगार खेळणारे तसेच अंमली पदार्थांच्या सेवनाने अनेकजण कर्जबाजारी होऊन त्यांच्यासमोर आत्महत्या करण्याशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही. त्यामुळे काही ग्रामस्थांनी भीतीच्या सावटाखाली का होईना पोलिस अधिकाऱ्यांकडे तोंडी तक्रार केल्याचे सांगितले. मात्र पोलिसांकडून नाईट क्रिकेट सामन्यात खेळल्या जाणाऱ्या चक्री जुगार अड्ड्यावर व अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्यावर कारवाई करण्यास टाळाटाळ केली जात आहे. तरी राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष देणे गरजेचे असल्याचे मत स्थानिक ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.
