• Wed. Jan 28th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

चिरनेरमधून जाणाऱ्या हायस्पीड राष्ट्रीय महामार्गाला केंद्र सरकारची मंजुरी

ByEditor

Mar 20, 2025

६ लेनच्या बांधकामांसाठी ४ हजार ५०० कोटींचा निधी मंजूर

अनंत नारंगीकर
उरण :
गोव्याला जाण्यासाठी मुंबई-गोवा महामार्ग हा एकमेव पर्याय आहे. मात्र लवकरच गोव्यासाठी आणखी एक मार्ग आकार घेत आहे. केंद्र सरकारने या मार्गासाठी मंजुरी दिली आहे. त्यामुळं आता मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक-कोंडी कमी होणार आहे. सदरचा हायस्पीड राष्ट्रीय महामार्ग हा उरण तालुक्यातील चिरनेर या ऐतिहासिक प्रसिद्ध गावातून जाणार असून मुंबई, कोकण आणि पुणे येथील नागरिकांचा प्रवासदेखील सुलभ होणार आहे. जेएनपीए बंदर (पागोटे) ते चौक (२९.२१९ किमी) पर्यंत ६ लेनच्या बांधकामांसाठी केंद्र सरकारने ४ हजार ५००.६२ कोटींचा निधी मंजूर केला आहे.

जेएनपीए बंदर, नवीमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि अटल सेतू या केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे उरण तालुक्यातील चिरनेर सह इतर परिसरातील अनेक गावांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यात गोवा, पुणे या महत्त्वाच्या ठिकाणांवरील ये-जा करणाऱ्या वाहनांची वाहतूक कोंडी मोडीत काढण्यासाठी तसेच नागरिकांचा प्रवास सुखकर होण्यासाठी जेएनपीएला जोडणाऱ्या ६ पदरी रस्त्याला केंद्र सरकारने मंजूरी दिली आहे. या मार्गाची लांबी २९ किलोमीटर असणार आहे. यासाठी केंद्र सरकारकडून ४ हजार ५००.६२ कोटी रुपयांच्या खर्चाला मंजुरी देण्यात आलीय. यामुळे मुंबई पुणे महामार्ग आणि मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक कोंडीतून प्रवाशांची सुटका होणार आहे. सध्या जेएनपीएवर पोहोचण्यासाठी ट्राफिकमुळे २ ते ३ तास लागतात. जेएनपीएला जोडला जाणाऱ्या या मार्गाची सुरुवात पागोटे या गावापासून होणार आहे.

हा महामार्ग अनेक महत्त्वपूर्व महामार्गांना जोडणार आहे. त्यापैकी उरण-चिरनेर हायवे, गोवा हायवे आणि पुणे एक्स्प्रेसवे यांना जोडण्यात येणार आहे. भविष्यात हा महामार्ग अलिबाग-विरार मल्टीमॉडल कॉरिडोर, मुरबाड-जुन्नर हायवे, समृद्धी एक्स्प्रेसवे आणि नाशिक हायवेला जोडण्यात येईल. वडोदरा-मुंबई ग्रीनफिल्ड एक्स्प्रेवेला देखील जोडण्यात येईल. या महामार्गामुळं जेएनपीए, गोवा, पुणे आणि मुंबईतील प्रवासाचा वेळ वाचणार आहे. हा नवीन महामार्ग अटल सेतूच्या शिवडीच्या टोकापासून ते कोस्टल रोड आणि वरळीच्या सी-लिंकला जोडण्यात येईल. भविष्यात अलिबाग-विरार मल्टीमोडल कॉरिडॉर, मुरबाड-जुन्नर महामार्ग, समृद्धी एक्सप्रेस वे आणि पडघा जवळील नाशिक महामार्गाशी (मोरबे, कर्जत, शेलू, वाघानी आणि बदलापूर मार्गे) जोडले जाईल. नवीन महामार्गावर १० हजारांहून अधिक वाहने. ज्यात मल्टी एक्सल कंटेनर ट्रकदेखील धावू शकणार आहेत.सदरचा राष्ट्रीय महामार्ग होण्यासाठी उरणचे आमदार महेश बालदी यांनी सातत्याने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मागणी केली होती. एकंदरीत आमदार महेश बालदी यांच्या प्रयत्नाना यश आल्याने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महेश बालदी मित्र मंडळाच्यावतीने आभार व्यक्त केले जात आहेत.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!