विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात समाजाचा पाठिंबा आणि भूमिका अत्यंत महत्वाची -सुधीर तेलंग
विनायक पाटील
पेण : जेएसडब्लू फाउंडेशन व मॅजिक बस इंडिया फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रायगड जिल्ह्यातील अलिबाग व पेण तालुक्यामधील 26 शाळांमध्ये ऑगस्ट 2024 पासून 1600 विद्यार्थांबरोबर जेएसडब्ल्यू अस्पायर डोलवी उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. या उपक्रमामार्फत जीवन कौशल्य आणि गणित व भाषा या विषयांचे पायाभूत मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधला जात आहे.
या उपक्रमाचा एक भाग म्हणून कळवे ग्रामपंचायत परिसरात रेखाटण्यात आलेल्या करियर पथदर्शक भित्तीचित्राचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी जेएसडब्लू सीएसआर हेड सुधीर तेलंग, असिस्टंट मॅनेजर कुणाल तडस, एक्झिक्युटिव्ह किरण म्हात्रे, सीईओ शालिनी, नंदिनी, केंद्रप्रमुख प्रमोद पाटील, विस्तार अधिकारी अनिल ठाकूर, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष अशोक मोकल, न्यू इंग्लिश स्कूल जोहे शाळेचे मुख्याध्यापक उत्तम गलांडे, सहशिक्षिका जागृती पाटील, करंडे सर, निवृत्त शिक्षक वासुदेव पाटील, ज्ञानेश्वर पाटील, कळवे ग्रामपंचायतचे सरपंच सतीश पाटील तसेच ग्रामपंचायतचे सर्व सदस्य, ग्रामसेविका शामल पाटील, अंगणवाडी सेविका, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पाहुण्यांची ओळख, स्वागत आणि सन्मानानंतर मान्यवरांच्या हस्ते भित्तीचित्राचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर सर्वांनी आपापले मनोगत व्यक्त केले. प्रमुख पाहुणे सुधीर तेलंग यांनी मुलांना करियरबद्दल छान मार्गदर्शन करून समाजाची भूमिका व पाठिंबा विद्यार्थ्यांच्या विकासासाठी कसा उपयुक्त ठरतो हे सप्रमाण पटवून दिले. तसेच जेएसडब्लूकडे समाजहिताच्या मागण्यांसाठी पाठपुरावा केल्यास ते नक्की मदत करतील यासाठी आश्वासन पूरक आवाहन केले. तर किरण म्हात्रे यांनी सर्वांना शुभेच्छा देत गावकऱ्यांच्या उपस्थितीबद्दल आनंद व्यक्त केला. सरपंच तसेच सर्व पालक आणि गावकरी यांनी या प्रकल्पाचे कौतुक करत दहावी आणि बारावीनंतर मुलांनी नक्की काय करायला हवे? कोणत्या कोर्सकडे वळले पाहिजे याचे मार्गदर्शन येथून मिळेल असा विश्वास व्यक्त केला. बऱ्याच पालकांनी स्वतःहून याबाबत अधिक माहिती जाणून घेण्यास उत्साह दाखविला आणि इतरांना देखील या ठिकाणी हे वाचण्यासाठी घेऊन येण्याची खात्री दिली.
करियर मार्गदर्शन वॉल पेंटिंगच्या उद्घाटनाची सर्व जबाबदारी शाळेच्या बालपंचायत पदाधिकारी यांनी अतिशय सुंदर पद्धतीने पार पाडली. या उपक्रमाचे शाळा व्यवस्थापन तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी व पालक वर्गांकडून फार कौतुक केलं जात आहे. सर्वांनी jsw आणि मॅजिक बस यांचे आभार मानले आणि प्रोग्राम साठी खूप खूप शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मॅजिक बसच्या क्लस्टर मॅनेजर डॉक्टर प्रगती पाटील, अकॅडमीक एज्युकेटर मेघा कार्लेकर, लाइफ स्किल एज्युकेटर पूजा म्हात्रे, सुकन्या, पायल आणि संपूर्ण टीमने विशेष मेहनत घेतली.
