शिवप्रेमी तथा माजी उपसरपंच वसीम कुर यांनी मशाल रॅलीमध्ये शिवज्योत घेऊन केली दौड
अब्दुल सोगावकर
सोगाव : अलिबाग तालुक्यातील मापगाव येथे ग्रामविकास परिवर्तन आघाडी तर्फे सोमवार, दि. १७ मार्च रोजी शिवजयंती (तिथीप्रमाणे) मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त विविध उपक्रम राबविण्यात आले.
शिवजयंती निमित्ताने सकाळी मापगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धपुतळ्याला अभिवादन करत ‘जय भवानी, जय शिवाजी’ च्या जयघोषात मापगाव ग्रामपंचायत हद्दीतील बहिरोळे, बेलवली, चोरोंडे, सोगाव, मूनवली व चोंढी मार्गे मुशेत ते मापगाव या गावांमधून भव्य मशाल रॅली काढण्यात आली, या रॅलीमध्ये असंख्य महिला व पुरुष यांसह मुस्लिम समाजातील शिवप्रेमी बांधव विविध पारंपरिक वेषभूषा परिधान करून मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. सोगाव भागात मशाल रॅली आल्यानंतर वसीम कुर यांनी काही अंतर शिवज्योत घेऊन दौड केली, हि मशाल रॅली मापगाव येथे आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धपुतळ्याची पूजाअर्चा करत उपस्थित सर्व मान्यवरांनी अभिवादन करत पुष्पहार अर्पण केले. यावेळी लहान मुलांनी उत्स्फूर्त चेतना जागवणारे पोवाडे सादर केले असता उपस्थितांनी दाद दिली. यावेळी अलिबाग-मुरुड मतदार संघाचे शिवसेना (शिंदे गट) आमदार महेंद्र दळवी, श्री क्लासेस चोंढीचे संस्थापक संतोष राऊत सर, शिवसेना (शिंदे गट) मापगाव विभाग प्रमुख जगदीश सावंत, शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष उत्तम राऊत, मापगाव ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच वसीम कुर, माजी सदस्य विजय भगत, अजित घरत, प्रभाकर मोहिते, तेजस काठे, सुमेश थळे, तसेच मापगाव ग्रामपंचायत हद्दीतील व पंचक्रोशीतील सर्व समाजातील तसेच सर्व स्तरातील महिला व पुरुष ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमदार महेंद्र दळवी यांच्या हस्ते आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले, याप्रसंगी तब्बल ४३ रक्तदात्यांनी रक्तदान करत आपली सामाजिक बांधिलकी जपली. सर्व रक्तदात्यांना शिवजयंती उत्सव समिती तर्फे मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी समितीने दुपारी चार वाजता महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन केले होते, या कार्यक्रमाला पंचक्रोशीतील शेकडो महिला उपस्थित होत्या, उपस्थित सर्व महिलांना भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. हळदी कुंकू कार्यक्रमानिमित्त महिलांसाठी लकी ड्रॉ पद्धतीने पैठणी व विशेष लकी ड्रॉ पद्धतीने रोख रक्कम अडीच हजार रुपये असले स्पर्धा घेण्यात आल्या. रात्री साडे आठ वाजता शिवसेना (शिंदे गट) मापगाव विभाग प्रमुख जगदीश सावंत पुरस्कृत शिवजयंती निमित्ताने गायक रोहित पाटील यांचा संगीत ऑर्केस्ट्रा आयोजित करण्यात आला होता, याच कार्यक्रमात लकी ड्रॉ विजेत्या महिला किरण कमळाकर हुमणे, भाविका हेमंत थळे, मयुरी महेश रेडीज यांच्या नावांची घोषणा करत त्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आकर्षक पैठणी देऊन सन्मानित करण्यात आले तर विशेष लकी ड्रॉ विजेत्या महिला सुजाता सुधाकर थळकर, दिव्या दत्तात्रेय राऊत, सुजाता तुकाराम घरत, रसिका राजेंद्र घरत यांना रोख रक्कम अडीच हजार रुपये देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी रात्री उशिरापर्यंत झालेल्या कार्यक्रमात सहभागी सर्व कलाकारांनी मधुर, लाजवाब संगीत, गीत व नृत्याने उपस्थित सर्वांची मने जिंकली.

