मृत्युशी कडवी झुंज देणाऱ्या अमोल मोरेचा दुर्देवी मृत्यू, सर्वत्र हळहळ व्यक्त
अमुलकुमार जैन
रायगड : रोहा अष्टमी नगरपरिषदेच्या जवळील रस्त्यावर अमोल मोरे हा दुचाकीस्वार आपल्या युनिकॉर्न गाडीवरून जात असताना डीव्हाडरवर आदळल्याने त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्याला उपचारासाठी डॉ. जाधव हॉस्पिटल नेण्यात आले होते. परंतु प्रकृती बिघडत असल्याने अधिक उपचारार्थ त्याला मुंबई येथे हलवण्यात आले होते. गेल्या काही दिवसापासून अमोल मोरे मृत्यूशी कडवी झुंज देत असताना अखेर गुरुवारी त्याची प्राणज्योत मालवली. अमोल मोरे याच्या अशाप्रकारे जाण्याने संपुर्ण कुटुंबियांवर आणि मित्र परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
अमोल मोरे (रा . भुवनेश्वर) हा तरुण आपल्या युनिकॉन गाडीवरुन प्रवास करत असताना रस्त्याच्या मधोमध असलेल्या डिव्हाडरला आदळुन डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याला चक्कर आली होती. तो जागच्या जागीच निपचीत पडला होता. त्याच्या नाकातोंडातुन रक्तस्त्राव होत असल्याने जमलेल्या जमावाने त्याला रिक्षातून दवाखान्यात नेले होते. प्राथमिक उपचारानंतर अमोल मोरे यांस अधिक उपचारार्थ मुंबई येथे हलविण्यात आले. गेली अनेक दिवस मृत्यूशी झुंज देत असताना अखेर त्याने गुरुवारी जगाचा निरोप घेतला. अमोल मोरे हा होतकरू मेकॅनिक व उत्तम ड्रायव्हर असताना सुद्धा पार्किंग, अरुंद रस्ता व नियोजनाचा अभाव यामुळे या निष्पाप होतकरुचा तरुणाचा जीव गेल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, रोहा शहरात अपुर्ण काम, दिशादर्शक फलक, रेडियम कुठेही नाहीत, मध्येच काही ठिकाणी डिव्हाइडर तसेच डिव्हाइडरसाठी सोडलेल्या जागेवर खड्डे यामुळे अनेक अपघात होत आहेत. अरुंद रस्ते , पार्किंग व्यवस्था, ठेकेदार व प्रशासन या अपघाताला कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे. प्रशासनाने लवकरच रस्ता व पार्किंग व्यवस्था प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी आता सर्वसामान्य जनतेतून होत आहे.
