पेण येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाकडून डीवायएसपींना निवेदन
विनायक पाटील
पेण : मुंबईच्या विधानभवन परिसरात पत्रकारांना सुरक्षारक्षकांकडून मंगळवारी धक्काबुक्की व अरेरावी करण्यात आली. या घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई, रायगड जिल्ह्याच्यावतीने निषेध करण्यात येत आहे.
पेण तालुक्यातही महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई संलग्न पेण पत्रकार संघाच्यावतीने शुक्रवार, २१ मार्च रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी पेण गजानन टोम्पे यांना निषेधाबाबत तालुकाध्यक्ष राजेश कांबळे, उपाध्यक्ष विनायक पाटील, सचिव स्वप्निल पाटील, खजिनदार किरण बांधणकर, सल्लागार दिपक लोके, सह सल्लागार गणेश पाटील, सदस्य रुपेश गोडिवले, प्रशांत पोतदार आदींनी निवेदन सादर केले.
मुंबईच्या विधानभवन परिसरात वृत्तांकन करत असताना तेथील सुरक्षारक्षकांनी पत्रकारांना धक्काबुक्की व अरेरावी केल्याने पत्रकारांच्या भावना दुखावल्या गेल्याने पेण येथील महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाकडून निषेध नोंदवून पत्रकारांना धक्काबुक्की करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी
निवेदनाद्वारे केली आहे.
लोकशाहीचा चौथा स्तंभ असणाऱ्या पत्रकारांच्या भावना महाराष्ट्रात दुखावल्या जातील अशा घटना घडत आहेत. महाराष्ट्रातील कोणत्याही ठिकाणी पत्रकारांवर अनुचित प्रकार घडल्यास महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ पत्रकारांच्या पाठीशी ठाम उभा राहणार आहे. तर रायगड जिल्ह्यातील पत्रकारांसोबत अनुचित प्रकार घडू नयेत याकरिता कोकण कार्याध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार शैलेश पालकर, जिल्हाध्यक्ष राकेश खराडे यांच्यासह जिल्ह्यातील तालुकाध्यक्ष व पदाधिकारी यांचे जिल्ह्यात विशेष कार्य सुरू आहे.
