अनंत नारंगीकर
उरण : उलवे नोडमधील गव्हाण विभागात सिडकोने संपादित केलेली १६ गुंठे जमिनीचे खोटे दस्तऐवज बनवून ती जमीन नवी मुंबईतील सारसोळे गावातील कैलास शंकर म्हात्रे या व्यक्तीस सुमारे १ कोटी २६ लाखांना परस्पर विकल्याचा भयंकर प्रकार उघडकीस आला होता. सिडकोने हे प्रकरण गांभिर्याने घेणे गरजेचे असून अशा प्रकारे किती जमिनींचे व्यवहार करून सिडकोची आणि नागरिकांची फसवणूक केली आहे हे तपासण्याची गरज निर्माण झाली आहे.
सिडकोची जमिन खोटे दस्त बनवून ती खाजगी असल्याचे भासवून शेतकऱ्याची फसवणूक केल्याचा गंभीर प्रकार निदर्शनास येऊन देखिल पोलिसांनी आरोपींना वाचविण्यासाठी गुन्हा नोंदला नव्हता. अखेर कैलास म्हात्रे यांनी न्यायालयात दाद मागितल्यानंतर न्यायालयाने चार आरोपींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानंतर शेकापचे नेते पांडुरंग पुंडलिक घरत, संतोष सावळाराम भगत, भाजपाचे अध्यक्ष अमर केसरीनाथ म्हात्रे आणि सिद्धेश नवनाथ घरत यांच्यावर ३० नोहेंबर रोजी गुन्हा दाखल झाला. त्यानंतर या आरोपींना कैलास म्हात्रे यांना पैसे परत करण्याच्या हमीवर अंतरीम जामिन देखिल मिळाला. मात्र, मुदतीत रक्कम परत न दिल्यामुळे त्यांचा जामिन अर्ज कोर्टाने फेटाळला. त्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक करणे गरजेचे असताना ते आरोपी उजळ माथ्याने फिरत असल्याचा आरोप कैलास म्हात्रे यांनी केला आहे.
या प्रकरणात पांडूरंग घरत, संतोष भगत, अमर म्हात्रे आणि सिद्धेश घरत यांच्यावर जसा गुन्हा दाखल करण्यात आला त्याचप्रकारे या प्रकरणात सामिल असणारे तलाठी, मंडल अधिकारी, दुय्यम निबंधक आणि शासकीय अधिकाऱ्यांवर देखिल गुन्हा दाखल करावा अशी मागणी कैलास म्हात्रे यांनी केली आहे. खोटे सातबारे बनवून त्या जमिनीचे रजिस्ट्रेशन करून कैलास म्हात्रे यांच्या नावावर सातबारा करण्यात या सर्वांचा सहभाग होता. याशिवाय या जमिनीचे रजिस्ट्रेशन होत असताना सर्व कागदपत्रे तपासणे गरजेचे असताना रजिस्ट्रेशन शुल्क देखिल कसे घेतले असा आरोप कैलास म्हात्रे यांनी केला आहे.
उलवे पोलिस हे या शासकीय अधिकाऱ्यांना वाचविण्याचा प्रयत्न करत असल्याचे कैलास म्हात्रे यांचे म्हणणे आहे. या बाबतीत कैलास म्हात्रे यांना सहकार्य करणारे शेकापचे राजेंद्र पाटील यांनी सांगितले की, जर उलवे पोलीस आरोपींना आणि सरकारी अधिकाऱ्यांना वाचविण्याचा प्रयत्न करत असतील तर आम्ही पुन्हा या प्रकरणी उच्च न्यायालयात दाद मागू आणि वेळ पडल्यास विधानसभेत याबाबत लक्षवेधी उपस्थित करण्यास सांगू असे शेतकऱ्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
आम्ही या प्रकरणात कुणालाही पाठीशी घालणार नाही. पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत. शासकीय अधिकाऱ्यांचा या प्रकरणात हात आहे असे तपासात निष्पन्न झाल्यास त्यांच्यावर देखिल गुन्हा दाखल करण्यात येईल.
-संतोष पिलाने,
सहाय्यक पोलिस निरिक्षक, उलवे पो. स्टे. आणि तपास अधिकारी
