अनंत नारंगीकर
उरण : घोटभर पाण्यासाठी पंधरा पंधरा दिवस चातकासारखी वाट बघणाऱ्या चाणजे ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील रहिवाशांसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून सुमारे १० कोटी ५९ लाख रक्कमेची पाणी योजना मंजूर झाली आहे.मात्र ठेकेदाराच्या मनमानी कामामुळे ही पाणी योजना अडचणीत आली आहे.
उरण तालुक्यातील चाणजे ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील करंजा,मुलेखंड,चाणजे,कोंडरी, आदिवासी वाडीसह इतर गावांतील रहिवाशांना नेहमीच भीषण पाणी टंचाईला तोंड द्यावे लागते. तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असूनही काही बेकायदेशीर वस्त्यांमध्ये पाणी चोरल्यामुळे विशेषतः सदर गावातील रहिवाशांना आठ ते पंधरा दिवसातून एकदा नळाचे पाणी मिळते. त्यामुळे या रहिवाशांसाठी पाणी हे अधिक मौल्यवान झाले आहे.

चाणजे ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील रहिवाशांची पाण्यासाठी होणारी परवड लक्षात घेता महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून चाणजे ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील पाणी टंचाईग्रस्त रहिवाशांना सुमारे साडे दहा कोटींची पाणी योजना उरणचे आमदार महेश बालदी यांच्या प्रयत्नाने मंजूर करण्यात आली. या पाणी योजनेसाठी बीड जिल्ह्यातील एका ठेकेदाराला काम देण्यात आले. मात्र त्याने या योजनेच्या कामाचे तीन तेरा वाजविले असून स्वतःच्या मर्जीनुसार काम केले आहे. या योजनेची मुख्य जलवाहिनी त्याने रहदारीच्या रस्त्यावर उघड्यावर ठेवली असून वाहनांच्या धडकांमुळे ती जलवाहिनी पूर्ण होण्या अगोदरच फुटून गेल्याने चाणजे ग्रामपंचायत हद्दीतील रहिवाशांना पाण्यासाठी वाट पाहावी लागेल असे सध्यातरी दिसून येत आहे. त्यातच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी हे सर्वसामान्य जनतेच्या समस्यांकडे दुर्लक्ष करत असल्याने सुमारे १० कोटी ५९ लाख रुपये ठेकेदारांच्या घशात घालण्याचा डाव तर नाही ना असा संशय रहिवासी व्यक्त करत आहेत.
शासकीय नियम पायदळी तुडवून चाणजे पाणी योजनेचे काम करणारा ठेकेदार उद्दामपणे वागत आहे.त्याने या पाणी योजनेची जलवाहिनी रस्त्याच्या कडेने खोल गाडून नेण्या ऐवजी रस्त्यावर उघड्यावर ठेवल्याने रस्त्यावरून येणाऱ्या वाहनांमुळे ही जलवाहिनी पाणी योजना पूर्ण होण्या अगोदरच फुटली आहे. एम जी पी ने नेमलेला ठेकेदार अत्यंत बेजबाबदार असून ते त्याच्या मर्जीनुसार जलवाहिनी टाकण्याचे काम करीत आहे.तरी सदर ठेकेदाराचे काम रद्द करून या कामाची फेरनिविदा करावी आणि पाणी योजना मार्गी लावावी.
-अजय म्हात्रे
सरपंच, ग्रुप ग्रामपंचायत चाणजे
चाणजे पाणी योजनेसाठी नेमलेल्या ठेकेदाराला नियमानुसार काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जर नियमानुसार काम होत नसेल तर त्याबाबत दखल घेऊन कारवाई करण्यात येईल. परंतु ठेकेदार हे अधिकाऱ्यांचे ऐकून घेत नाहीत.
-नामदेव जगताप
कार्यकारी अभियंता
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, पनवेल
