उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत चांदे क्रीडांगणावर होणार पक्षप्रवेश सोहळा
मिलिंद माने
महाड : कोकणातील राष्ट्रवादी पुन्हा हा नाद लवकरच स्नेहल जगताप यांच्या रूपाने कोकणकरांना अनुभवास मिळणार असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील पक्षप्रवेश सोहळा हा एप्रिल महिन्यात महाडमधील चांदे क्रीडांगणावर भव्य दिव्य स्वरूपात होणार असून या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत होणार असल्याने या पक्षप्रवेश सोहळ्याची चर्चा रंगू लागली आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूरपासून दापोली विधानसभा मतदारसंघातील सर्वांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करून आपले राजकीय स्थैर्य पुन्हा प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला आहे, मात्र रायगड जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीत पराभव झालेल्या स्नेहल जगताप यांनी मात्र शिवसेना शिंदे गट व भाजपाची ऑफर धुडकावून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणे पसंत केल्याचे निश्चित झाले आहे.
महाडच्या माजी नगराध्यक्ष व माजी आमदार कै. माणिकराव जगताप यांच्या कन्या स्नेहल माणिकराव जगताप यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करून विधानसभा निवडणूक लढवली होती. मात्र, विधानसभा निवडणुकीत त्यांचा २६,२१० मतांनी विद्यमान आमदार व राज्याचे रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांनी पराभव केल्यानंतर जगताप कुटुंबामध्ये सातत्याने होणाऱ्या पराभवामुळे नैराश्याचे वातावरण पसरले होते. त्यातच पराभवानंतर त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याकडे वाटचाल सुरू केली होती. त्यासाठी त्यांनी भाजपच्या मुंबईतील नेत्यांसोबत बैठका देखील केल्या होत्या. मात्र अपेक्षित राजकीय पुनर्वसनाच्या तडजोडी न झाल्याने त्यांचा मार्ग खडतर होत होता. मात्र राजकीय डावपेच्यात मातब्बर असणाऱ्या ३२ रायगड लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार सुनील तटकरे यांनी अखेर आपले राजकीय कसब पणाला लावत जगताप कुटुंबाला अखेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्यास भाग पाडले.
उपमुख्यमंत्र्यांबरोबर झालेल्या बैठकीत राजकीय तोडगा निघाला!
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीत स्नेहल जगताप यांचा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात प्रवेश घेण्याबाबत शिक्कामोर्तब झाले व राजकीय पुनर्वसनाबाबत जगताप कुटुंब व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यामध्ये झालेली राजकीय तडजोड यशस्वी झाल्याने स्नेहल जगताप यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात पक्षप्रवेश करण्यावर शिक्कामोर्तब केले आहे. त्यानुसार त्यांचे राजकीय पुनर्वसन राज्यमंत्रीपदाचा दर्जा असणाऱ्या महामंडळावर करून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कोकणातील रायगड जिल्ह्यातून राष्ट्रवादी पुन्हा हा नाद रायगडच्या पायथ्यापासून तळ कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापर्यंत पुन्हा एकदा जोमाने करण्याबाबत या बैठकीत एक मत झाले असून १९४ महाड विधानसभा मतदारसंघातील स्नेहल जगताप यांच्या कार्यकर्त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सामावून घेतल्यानंतर पक्षातील व सरकारमधील विविध समित्यांवर नियुक्त करण्याबाबत एक मत झाल्याचे बोलले जात आहे.
महाडमधील चांदे क्रीडांगणावर होणार भव्य पक्षप्रवेश सोहळा
महाडमधील चांदे क्रीडांगणाला ऐतिहासिक वारसा आहे. या ठिकाणी असणाऱ्या मैदानात अनेक जाहीर सभा महाडकरांनी प्रत्यक्ष अनुभवल्या आहेत. याच क्रीडांगणात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी स्नेहल जगताप यांचा पक्षप्रवेश सोहळा घेतला होता. त्याच क्रीडांगणात पुन्हा एकदा स्नेहल जगताप यांचा पक्षप्रवेश सोहळा राज्याचे उपमुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्ष तसेच ३३ रायगड लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार सुनील तटकरे व राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्री या पक्षप्रवेश सोहळ्यास उपस्थित राहणार असल्याने हा पक्ष प्रवेश सोहळा मोठ्या दिमाखात व जल्लोषात साजरा होणार असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रायगड भूमीमधून पुन्हा एकदा राष्ट्रवादी पुन्हा हा नाद रायगडपासून तळ कोकणापर्यंत घुमणार असल्याची चर्चा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील कार्यकर्त्यांपासून जगताप यांच्या कार्यकर्त्यांमध्ये ऐकण्यास मिळत आहे.
