अमुलकुमार जैन
अलिबाग : रायगड जिल्ह्याचे मुख्यालयीन ठिकाण असलेल्या अलिबाग बस स्थानकाबाहेर एसटी बस आणि दुचाकीच्या अपघात होवून या अपघातात एकवीस वर्षीय जयदीप शेखर बना याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना 27 फेब्रुवारी रोजी घडली होती. एसटीच्या अपघातांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत असून कोर्लई पेट्रोल पंपानजिक एसटी बसच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना २१ मार्च रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास घडली आहे. यामुळे एसटी महामंडळ विरोधात संतप्त वातावरण नागरिकांमध्ये निर्माण होत चालले आहे.
रायगड जिल्ह्यातील साळाव-बोर्ली रस्त्यावर असणाऱ्या कोर्लई येथील पेट्रोल पंप नजिक एसटी बसच्या धडकेत गजानन महादेव भोबु (वय ६२, रा. बोर्ली वाडीपाडा, ता. मुरुड) यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली असून याबाबत गजानन महादेव भोबु यांच्या पत्नी निलिमा गजानन भोबू (वय ५१) यांनी एसटी बस क्र. एमएच २० बीएल ३२४२ वरील चालक याच्याविरोधात रेवदंडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, मुरुड तालुक्यातील बोर्ली येथील गजानन भोबू हे दिनांक २१/०३/२०२५ रोजी रेवदंडा येथुन बोर्ली येथे घरी येत असताना कोर्लई गावाचे हद्दीत पेट्रोलपंपाजवळ रेवदंडा मुरुड रोडवर आले असता रेवदंडा बाजुकडुन बोर्ली बाजुकडे जाणारी एसटी बस क्र. एमएच २० बीएल ३२४२ वरील चालक याने त्याच्या ताब्यातील एसटी ही भरधाव वेगात चालवून रस्त्याचे बाजुला चालणारे गजानन भोबू यांस पाठीमागुन ठोकर मारून अपघात करुन सदरच्या अपघातामध्ये पति गजानन भोबु यांस वैद्यकीय उपचाराकरीता न नेता तेथून पळून गेला आहे. याबाबत रेवदंडा पोलिस ठाण्यात कॉ. गु. रजि. नं. ३५/२०२५ भारतीय न्याय संहीता कलम २०२३चे कलम १०६(१), २८१, १२५(अ), १२५ (ब) प्रमाणे, मो.वा.का कलम १८४ प्रमाणे दाखल करण्यात आला असून असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक मढावी करीत आहेत.
