अलिबाग नगरपालिकेची वसुली करताना होतेय दमछाक; विकासकामांवर परिणाम
अमुलकुमार जैन
रायगड : जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या अलिबाग नगरपरिषद हद्दीत असणाऱ्या ८०हुन अधिक शासकीय कार्यालयांकडे नगरपालिकेच्या घरपट्टी कर विभागाची ४९ लाख १३ हजार ५५१ इतक्या रुपयांची मालमत्ताकर थकीत असल्याने अलिबागच्या विकासकामांवर त्याचा विपरीत परिणाम होत आहे.
अलिबाग नगरपरिषद हद्दीत असणाऱ्या रायगड जिल्हा परिषद कार्यालयापासून थेट अप्पर जिल्हाधिकारी निवासस्थानापर्यंत सर्व शासकीय कार्यालये, निवासस्थान तसेच काही इतर नावाजलेल्या संस्थांचे देखील मालमत्ता कर थकीत आहे. सर्वात अधिक कर रायगड जिल्हा परिषद विभाग यांचा २३ लाख २२ हजार ७१६ इतका असून त्या खालोखाल नगररचना कार्यालय अलिबाग ७ लाख ८३ हजार ४१२, डायरेक्टर ऑफ ॲनिमल हजबंड्री ६ लाख ६० हजार ५६९ रुपये इतकी आहे. तर सर्वात कमी ट्रेझरी ऑफिस रायगड अलिबाग यांची दंडासाहित एकूण थकबाकी ही तीन हजार रुपये इतकी आहे. अलिबाग नगरपरिषद हद्दीत बारा हजाराच्या आसपास मालमत्ता असून त्यामध्ये शंभरच्या आसपास शासकीय कार्यालये, निवासस्थाने आहेत.
अलिबाग नगर परिषदेने कर वसुलीसाठी पाच वसुली पथकं नेमली असून प्रत्येक पथकामध्ये तीन ते पाच जणांची निवड करण्यात आली आहे. वसुली पथकातील कर्मचाऱ्यांनी घरोघरी भेटी देऊन नागरिकांकडून कर वसुली मोहीमेला सुरुवात केली आहे. करवसुली मोहिमेला नागरिकांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत असून नागरिकांकडून नगरपरिषदेच्या थकीत करांचा भरणा करण्यात येत आहे.
जिल्ह्यातील सर्व नगरपरिषदांनी कर वसूलीसाठी विशेष पथकांची नियुक्ती केली असून दैनंदिन करवसूलीचा आढावा मुख्याधिकारी यांचेकडून घेण्यात येत आहे. नियुक्त विशेष पथके शहरातील विविध भागांत करदात्यांच्या भेटी घेऊन करवसुलीमध्ये महत्त्वाचे योगदान देत आहेत. अशी माहिती अलिबाग नगरपरिषदेच्या प्रशासक तथा मुख्याधिकारी सचिन बच्छाव यांनी दिली.
मुदतीत व परिपूर्ण कर वसूलीमुळे नागरिकांना नागरी सुविधा प्रदान करणे, स्वच्छता राखणे, नगरपरिषदेद्वारे संचलित होणारे दैनंदिन कामे करणे सुकर होतात. यामुळे नगरपरिषदेस नवनवीन योजना संकल्पना राबविण्यास मदत होते. नगरपरिषदे मार्फत सर्व मिळकत धारकांचे घरपट्टी बिलांचे वाटप करण्यात आलेले आहे. तसेच नगरपरिषद अधिकारी कर्मचारी हे दैनंदिन प्रत्येक वॉर्ड निहाय घरोघरी जाऊन सदरील बिले भरणेबाबत जागृती करीत आहे. यामध्ये नागरिकांनी उशिरा मिळकत कर भरल्यास त्यांना प्रति माह 2% व्याज दंडाच्या स्वरूपात रक्कम भरावी लागू शकते. त्याकारणाने सर्व मिळकत धारकांनी लवकरात लवकर मिळकत कर व पाणीपट्टी कर भरावे. अन्यथा थकबाकी मिळकतवर जप्तीची कारवाई होऊ शकते. मालमत्ता कर नागरी सुविधा केंद्रात भरणा करू शकतात. अलिबाग नगरपरिषद हद्दीतील सर्व नागरिकांनी लवकरात लवकर आपलेकडे असलेले मिळकत व पाण्याबाबतचे देयकातील रक्कमेचा ऑनलाइन अथवा नगरपरिषद कार्यालयात येऊन भरणा करून नगरपरिषदेस सहकार्य करून नगरपरिषदेच्या विकासकार्यात हातभार लावण्याचे आवाहन प्रशासक सचिन बच्छाव यांनी केले आहे.
| नगर परिषदेच्या हक्काचे उत्पन्न असलेल्या घरपट्टी मालमत्ता कराचे उद्दिष्ट बारा कोटी रुपये असून २३ मार्च २०२५ पर्यंत ५ कोटी ८० लाख ४६ हजार ४५९ . त्यातील आतापर्यंत फक्त ४८.३७२ टक्के कर वसूल झाला आहे. मार्च अखेरच्या पार्श्वभूमीवर वसुलीचे उद्दिष्ट गाठणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे विविध कर विभागाने थकबाकीदारांना नोटिसा बजावल्या आहेत. |
शहराचा विकास व सर्व प्रकारच्या नागरी सुविधा पुरविण्यासाठी करवसुली शंभर टक्के होणे महत्वाचे आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वतःहून कराचा भरणा केल्यास शहराचा विकास होण्यास वेळ लागणार नाही. नागरिकांनी ही बाब गांभीर्याने घ्यावी, अशी अपेक्षा आहे.
-सचिन बच्छाव,
प्रशासक तथा मुख्याधिकारी
शासकीय कार्यालयांची एकूण थकबाकी रुपयात
डायरेक्टर ऑफ ॲनिमल हजबंड्री : ६६०५६९
डेप्युटी इंजिनिअर बांधकाम विभाग, राजिप : ३१५६७
अध्यक्ष, रायगड जिल्हा परिषद : १८९९७
मुख्य कार्यकारी अधिकारी,राजिप : २३२७१६
अप्पर जिल्हाधिकारी निवास : १७५४३
जिल्हा रुग्णालय अलिबाग : २०४६२४
जिल्हा शल्य चिकित्सक : ६१ हजार
जिल्हा शल्य चिकित्सक : २१८९९७
फायनान्स डिपार्टमेंट राजिप : १७९०१
गट विकास अधिकारी अलिबाग : १३६१५७
सरचिटणीस संघटना कार्यकारी सदन अलिबाग : ६६९८०
डेप्युटी इंजिनिअर सार्वजनिक बांधकाम विभाग : ४०१४३
नगररचना कार्यालय अलिबाग : ७८३४१२
जिल्हा उद्योग केंद्र : ७८८३२
अलिबाग तहसीलदार : १६८८३
अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क : १३३६१
जिल्हा मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी : ११९३६
मत्स्य विकास संचालक : ३०२४४
कुलाबा जिल्हा मुलकी सेवक वर्ग कल्याण निधी : ६१३३७
उपविभागीय कार्यालय तहसीलदार रायगड : १८ हजार
जिल्हा निबंधक सो रायगड अलिबाग : ३५ हजार
ट्रेझरी ऑफिस रायगड अलिबाग : ३ हजार
आदिसहीत एकूण ८८ शासकीय कार्यालयाकडे ४९ लाख १३ हजार ५५१ इतकी मागील थकबाकींसह चालुवर्षाचा मालमत्ता कर येणे बाकी आहे.
