सलीम शेख
माणगाव : माणगाव नगरपंचायत हद्दीतील वॉर्ड क्र.४ मधील वाकडाईनगर महिला मंडळ आणि नगरसेविका ममता थोरे ग्रामीण विकास व रोजगार प्रशिक्षण संस्था यांच्या सौजन्यानेे जागतिक महिला दिनानिमित्त व सावित्रीबाई फ़ुले यांच्या स्मृती दिनानिमित्त शुक्रवार दि.२१ मार्च २०२५ रोजी ‘एक संध्याकाळ महिलांसाठी’ कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. या संध्याकाळ कार्यक्रमामध्ये विविध गमतीशीर कार्यक्रमाचा महिलांनी मनमुराद आनंद लुटून नगरसेविका ममता थोरे यांना विशेष धन्यवाद दिले.
नगरसेविका ममता थोरे यांचा सामाजिक,शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक व राजकीय क्षेत्रात नेहमीच सक्रिय सहभाग राहिला आहे. नगरसेविका म्हणून या वॉर्डातून सन २०२१ मध्ये निवडून आल्यापासून लोकप्रतिनिधी कसा असावा याचे उत्तम उदाहरण त्यांच्या रूपाने वॉर्डातील ग्रामस्थांना दाखून दिले आहे. वॉर्डाचा सर्वांगीण सुंदर विकास झाला पाहिजे हा उद्देश नजरेसमोर ठेऊन वॉर्डातील विकासकामांबरोबरच वॉर्डातील ग्रामस्थांसाठी विविध उपक्रम राबविण्यावर ममता थोरे यांचा नेहमीच भर राहिला आहे. त्यामुळे या वॉर्डातील ग्रामस्थांची मने त्यांनी जिंकली आहेत.
अशाच एक उपक्रमापैकी सलग तिसऱ्या वर्षी नगरसेविका ममता थोरे यांनी आपल्या संकल्पनेतून सुरू केलेल्या वॉर्ड क्रमांक ४ मध्ये वाकडाईनगर येथे वाकडाईनगर महिला मंडळ व ममता ग्रामीण विकास व रोजगार प्रशिक्षण संस्था यांच्या सौजन्यानेे “एक संध्याकाळ महिलांसाठी” हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी सर्व महापुरुषांच्या प्रतिमेस हार अर्पण करुन व श्रीफळ वाढवून या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी महिलांकरिता विविध खेळांच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेतील सर्व विजेत्यांसाठी आणि सर्व उपस्थितांसाठी भेटवस्तूचे वाटप करण्यात आले. सर्व महिला मंडळ यांच्या सहकार्याने व उपस्थितीत सलग तिसऱ्या वर्षी हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यात आल्याने नगरसेविका ममता थोरे यांनी सर्वांचे मनःपूर्वक ऋण व आभार व्यक्त केले.
