• Mon. Jul 28th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

आगामी सण, उत्सव कायदा व सुव्यवस्थेचे पालन करून सौहार्दपूर्ण वातावरणात साजरे करावेत -मंत्री आदिती तटकरे

ByEditor

Mar 27, 2025

रायगड : श्रीराम नवमी, हनुमान जयंती, महावीर जयंती, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आणि गुढी पाडवा व रमजान ईद हे सण, उत्सव कायदा व सुव्यवस्थेचे पालन करून सौहार्दपूर्ण वातावरणात साजरे करण्यासाठी सर्वांनी जिल्हा प्रशासनासह पोलिस यंत्रणेला सहकार्य करावे, असे आवाहन महिला व बालविकास मंत्री कु.आदिती तटकरे यांनी केले. तसेच या कालावधीत जिल्हा पोलिसांची सोशल मीडियवर करडी नजर असून कुणीही सामाजिक एकता व सलोखा तसेच शांतता भंग करणारा मजकूर प्रसारीत करू नये, असे आवाहनही आदिती तटकरे यांनी केले.

रायगड जिल्हा प्रशासनाच्या मार्फत गुढीपाडवा, रमजान ईद, श्रीराम नवमी, हनुमान जयंती, महावीर जयंती, डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त नियोजन भवन सभागृहात शांतता कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. या बैठकीला जिल्हाधिकारी किशन जावळे, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड, अपर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे, निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांच्यासह शांतता समिती सदस्य, सर्व उपविभागीय अधिकारी, पोलीस अधिकारी उपस्थित होते.

आगामी सण व उत्सवाचा काळ लक्षात घेता जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सर्वांनी सामूहिक प्रयत्न करावेत. सण-उत्सव साजरे करताना न्यायालयांच्या तसेच प्रशासनाच्या आदेशांचे पालन होईल याकडे विशेष लक्ष द्यावे. उत्सवाला कोणतेही गालबोट लागणार नाही याची काळजी घ्यावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. सण उत्सव आणि सलग आलेल्या सुट्ट्या पाहता पर्यटक मोठया प्रमाणावर येण्याची शक्यता आहॆ. हे लक्षात घेता जिल्ह्यातील वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी बायपास मार्ग काढणे तसेच पर्यायी रस्ते कसे विकसीत करता येईल, याबाबत नियोजन करावे, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.तसेच या कालावधीत रुग्णवाहिका तैनात ठेवाव्यात. याबरोबरच फायर ब्रिगेडच्या गाड्या देखील सुसज्ज ठेवाव्या. अनेकदा मिरवणूक मार्गांवर अंधार असतो त्या ठिकाणी हॅलोजनची व्यवस्था करावी. तसेच याकाळात वीज पुरवठा सुरळीत राहील याची दक्षता घ्यावी असे निर्देश आदिती तटकरे यांनी दिले.

सोशल मीडियावर करडी नजर

सण उत्सवा दरम्यान शांतता भंग करणारे तसेच कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणणारे अनुचित प्रकार होणार नाहीत. तसेच फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप, ट्विटर व इतर सोशल मीडियावर तेढ निर्माण करणाऱ्या व खोट्या बातम्या प्रसारित करणारे व्हिडीओ किंवा पोस्ट प्रसारित करणाऱ्यांविरुध्द् रायगड जिल्हा पोलीस दलातील सायबर सेल मार्फत सोशल मीडियावर 24 तास विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे. पोलिसांनी जिल्ह्यातील जातीय सलोखा कायम ठेवण्यासाठी सोशल मिडीयावरील घटनांचे विश्लेषण करण्यासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग करावा. प्रक्षोभक पोस्ट करणाऱ्या व्यक्तीवर तात्काळ कारवाई करावी अशा सूचना आदिती तटकरे यांनी यावेळी दिल्या. सर्वांनी सामाजिक शांतता ही नैतिक व सामूहिक जबाबदारी मानून कार्यक्रम करावेत. तसेच पोलीस प्रशासनाने देखील ज्या मिरवणूक व कार्यक्रम यांना ज्या नियमाच्या आधारे परवानगी दिली आहॆ त्याची एक प्रत कार्यक्रमासाठी निमंत्रित यांना द्यावी. या कार्यक्रमात शांतता भंग होणार याची दक्षता घ्यावी असे निर्देश तटकरे यांनी दिले.

जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी हे सर्व सण उत्सव उत्साहात व शांततापूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे सांगितले. या काळात जिल्ह्यातील वाहतुकीचे नियोजन करण्यात येईल. तसेच ज्या गावांमध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा होतो तेथे पुरेसे टँकर द्वारे पाणी पूरविण्यात येतील असेही सांगितले. तसचे सर्व सण, उत्सवाच्या काळात ड्रोन कॅमेऱ्याद्वारे विशेष पाहणी करण्यात येणार आहे.

जिल्हा पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी रायगड जिल्ह्यात विविध सण आणि उत्सवांच्या निमित्ताने अनेक शोभायात्रा, मिरवणुका, रॅली आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. या कार्यक्रमांच्या सुरक्षिततेसाठी आणि सुव्यवस्थेसाठी जिल्हा प्रशासनाने केलेल्या उपाययोजनाची माहिती दिली.

जिल्ह्यात गुढीपाडव्यानिमित्त 22 शोभायात्रा, 2 मिरवणुका आणि 1 बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. रमजान ईदनिमित्त जिल्ह्यात 232 मशिदी, 21 दर्गे, 19 मदरसे आणि इतर 3 ठिकाणी एकूण 50,000 ते 60,000 लोकांच्या उपस्थितीत कार्यक्रम होणार आहे. श्रीराम नवमी उत्सव निमित्त 150 मंदिरे, 133 मिरवणुका आणि 17 इतर कार्यक्रम होणार आहेत. हनुमान जयंतीनिमित्त 511 मंदिरे, 289 मिरवणुका, 27 यात्रा आणि 16 विविध कार्यक्रम होणार आहेत. महावीर जयंतीनिमित्त 28 मंदिरे, 20 मिरवणुका आणि 2 इतर कार्यक्रम होणार आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे 94 मिरवणुका, 76 पुतळा पूजन आणि 263 प्रतिमा पूजन कार्यक्रम होणार आहेत. या सर्व काळात पोलीस प्रशासन सज्ज आहे. जिल्ह्यात विशेष दहशतवादी विरोधी पथक, सोशल मीडिया देखरेख पथक, RCP प्लॅटुन,QRT प्लॅटुन यांची विशेष नेमणूक करण्यात आली आहे. तसेच भारतीय न्याय संहितेअंतर्गत 1,227 प्रतिबंधात्मक कारवाया आणि दंगाकाबू रंगीत तालीम विविध ठिकाणी करण्यात आले असल्याचे ही श्री. घार्गे यांनी सांगितले.

अपर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे यांनी आभार प्रदर्शन केले. शांतता समितीच्या बैठकीत समितीचे सदस्य तसेच पत्रकार यांनी विविध सूचना मांडल्या. वाहतूक कोंडी, वीज पुरवठा,पुरेश्या प्रमाणात पाणी, सीसिटीव्ही उपलब्धता, सोशल मीडियाच्या माध्यमातून पाठविले जाणारे चुकीचे संदेश या विविध सूचनांची जिल्हा प्रशासनाने दखल घेवून त्यावर तात्काळ उपाययोजना करण्यात येतील असे आश्वस्त केले.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!