झाडांच्या कत्तलीकडे वनविभागाचे दुर्लक्ष; दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी
विशेष प्रतिनिधी
पनवेल : उन्हाळा जसा तापू लागतो तसे वन खात्याच्या जंगलांना आगी लागण्याच्या घटनात वाढ होते. आताही राज्यात कुठे न कुठे वन खात्याच्या जंगलांना आगी लागून वणवे पेटल्याच्या बातम्या वर्तमान पत्रात वाचायला मिळतात. काही वेळा या आगी वेळीच आटोक्यात येतात पण बऱ्याचदा या आगी वेळीच आटोक्यात न आल्याने त्या रौद्ररूप धारण करतात आणि त्याचे रूपांतर मोठ्या वणव्यात होते आणि त्यात बहुमोल अशी निसर्ग संपदा जळून खाक होते.

गेल्या काही वर्षात वणवे लागण्याचे प्रमाण ज्याप्रकारे वेगाने वाढत आहे तो एक नव्या संकटाचा इशारा आहे. नैसर्गिक कारणामुळे जंगलांना वणवे लागण्याच्या घटना तर घडतातच पण मानवनिर्मित वणवे लागण्याचा घटनांची संख्याही प्रचंड आहे. दरवर्षी उन्हाळा आला की जंगलांना आग लागण्याच्या घटना घडतात. उन्हाळ्यात लागणारे हे वणवे नैसर्गिक असल्याचे भासवले जाते पण हे यातील बरेचसे वणवे मानवनिर्मितच असतात हे उघड सत्य आहे. काही समाजकंटक जाणीवपूर्वक शहराजवळच्या डोंगरावरील हिरवाईला वणवे लावून ती नष्ट करतात. पनवेल तालुक्यातील दुंदरे संरक्षित वन स. क्र. २४ मधील १५ ते २० हेक्टर क्षेत्रातील रोपवन वणवा लागल्याने व वृक्षतोड झाल्याने नष्ट झाले आहे.

पनवेल तालुक्यातील दुंदरे भागात १५ ते २० हेक्टर क्षेत्रात रोपांची लागवड करण्यात आली होती. येथे लागलेल्या आगीमध्ये हजारो रोपे जळून खाक झाली. तसेच मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाल्याने येथील रोपवन नष्ट झाले आहे. वनक्षेत्राला आग लागण्याची कारणे, आग कोणी लावली किंवा कशी पसरली, तसेच या आगीसाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची जबाबदारी या सर्व गोष्टींची चौकशी होणे गरजेचे आहे. शासन प्रतिवर्षी करोडो रुपये वृक्षलागवड व संवर्धनावर खर्च करीत आहे. मात्र वनविभागाच्या दुर्लक्षितपणामुळे आज वनांना लागणाऱ्या आगीमुळे हा करोडो रुपयांचा निधी खाक होत आहे. रोपांचे एकूण क्षेत्र, लावण्यात आलेली रोपांची संख्या, जिंवत रोपांची टक्केवारी, आगीमुळे झालेले नुकसान या सगळ्याचा आढावा घेणे गरजेचे आहे. शासनाकडून निधी प्राप्त होत असेपर्यंत दुंदरे येथील रोपवनाची निगा राखण्यात येत होती. मात्र निधी बंद झाल्यानंतर वनविभागाने रोपवनाकडे दुर्लक्ष केल्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात वृक्षतोड देखील झाल्याचे काही स्थानिक नागरिकांकडून सांगण्यात येत आहे.

आजही शासनाकडून वन वणवा नियंत्रणासाठी मोठ्या प्रमाणात निधी प्राप्त होत असतानाच हा निधी लाटून वनातील आगीकडे दुर्लक्ष केल्यामुळे आज वने नष्ट होत चालली आहेत. दुंदरे येथील रोपवन फायर लाईनच्या कामाचे पैसे हडपल्याने या रोपवनाला आग लागली. यात १५ ते २० हेक्टर रोपवन राख झाले. भ्रष्टाचाराचा कळस गाठणाऱ्या या अधिकाऱ्यांवर कारवाई न झाल्याने वरिष्ठ अधिकारी त्यांच्यावर मेहरबान आहेत का? असा सवाल नागरिकांनामधून उपस्थित होत आहे. यामध्ये दोषी असणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा नोंद करून कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
