क्रीडा प्रतिनिधी
रायगड : रसायनी पाताळगंगा येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सिक्युरिटी मार्केटसच्या मैदानावर पनवेल क्रिकेट स्पोर्ट्स अकॅडमी यांनी आयोजित केलेल्या कॉर्पोरेट ट्रॉफी टी- २० क्रिकेट स्पर्धेत जेएसडब्ल्यू डोलवी संघानी आरसीएफ थळ क्रिकेट संघावर ७९ धावांनी विजय मिळवत स्पर्धेत चॅम्पियन्स होण्याचा मान मिळवला आहे.
नाणेफेक जिंकून आरसीएफ संघाने प्रथम जेएसडब्ल्यू डोलवी संघाला फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केले होते. प्रथम फलंदाजी करताना जेएसडब्ल्यू डोलवी संघानी २० षटकांच्या समाप्तीनंतर ७ गडी गमावत १९७ धावा फलकावर नोंदवल्या. त्यामध्ये ओंकार वालेकर यांनी सर्वाधिक ४५, कर्णधार समीर पाटील ३६, प्रसाद पाटील यांनी २८ धावांचे योगदान संघाला दिले. आरसीएफ थळ संघाकडून सचिन जाधव व थळकर यांनी प्रत्येकी दोन फलंदाज बाद केले. १९८ धावांचे लक्ष घेऊन फलंदाजीला आलेल्या आरसीएफ थळ संघानी २० षटकात ९ गडी बाद ११४ धावा काढल्या. त्यामध्ये हर्षल सोंडकर यांनी सर्वाधिक ४७ व संकेत म्हात्रे यांनी २७ धावा काढल्या. जेएसडब्ल्यू संघाकडून मृत्युंजय ठाकूर यांनी ३ तर कर्णधार समीर पाटील यांनी २ फलंदाज बाद केले. जेएसडब्ल्यू डोलवी संघानी सामना ७९ धावांनी जिंकला. सामनावीर म्हणून समीर पाटील, उत्कृष्ठ गोलंदाज केदार बिर्जे (आरसीएफ), उत्कृष्ठ फलंदाज प्रशांत पाटील (जेएसडब्ल्यू), उत्कृष्ठ क्षेत्ररक्षक अमोल ढोले (आरसीएफ) तर मालिकावीर म्हणून मृत्युंजय ठाकूर (जेएसडब्ल्यू) यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
बक्षीस वितरण कार्यक्रमासाठी आरसीएफचे ज्येष्ठ खेळाडू प्रसन्न कठोर, पीसीएसए सचिव सागर कांबळे, पंच ॲड. पंकज पंडित, निशांत माळी, आदेश नाईक उपस्थित होते.