• Mon. Jul 28th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

भंगाराची गोदामं बनली गुन्हेगारीचे अड्डे!

ByEditor

Mar 27, 2025

अनंत नारंगीकर
उरण :
उरण तालुक्यात सध्या परप्रांतिय भंगारवाल्यांनी अनेक ठिकाणी भंगाराची दुकाने थाटली असून संपुर्ण उरण तालुक्याला या भंगार माफियांचा विळखा पडला आहे. या भंगारवाल्यांनी सिडकोच्या, जेएनपीएच्या आणि महसूल विभागाच्या करोडो रूपयांच्या मोक्याच्या जागांवर अतिक्रमण केल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. या भंगारवाल्यांच्या दुकानांमधून चोरीच्या मालाची मोठ्या प्रमाणात खरेदी विक्री होत असल्याने चोरी केलेला माल सर्रासपणे भंगार व्यावसायिकांना विकत असल्याचे दिसून येत आहे. एकंदरी अशा भंगाराच्या गोदामामुळे स्थानिक तरुण, कामगार वर्ग हे गुन्हेगारीकडे वळत असल्याचे दिसत आहे.

उरण तालुक्यातील सिडको, महसूल आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेवर भंगारवाल्यांची दुकाने सुरू झाली असून अनेक शासकीय जागांवर या भंगार माफियांनी आपला ताबा घेतला आहे. उरण शहर, जेएनपीए बंदर परिसर, उरण – पनवेल रस्ता, खोपटा पुलापासून ते नवघर व पुढे नवघर ते आयओटीएल कंपनी, दास्तान फाटा ते दिघोडे, गव्हाण फाटा ते चिरनेर,कोप्रोलीपर्यंत अनेक भंगाराची दुकाने दिसून येतात. हे बहूतांशी भंगारवाले परप्रांतिय असून एखाद दुसऱ्या स्थानिकाला हाताशी धरून ते या व्यवसायात आपला जम बसवत आहेत. जास्त पैसा कमावण्यासाठी हे भंगारवाले कोणतीही धोकादायक वस्तू खरेदी करायला मागे पुढे पहात नाहीत. काही वर्षापुर्वी उरण तालुक्यात अनेक ठिकाणी रॉकेट लाँन्चर्स सारख्या वस्तू पोलिसांनी जप्त केल्या होत्या. या भंगारवाल्यांच्या अशा बेफिकीरी वृत्तीमुळे एखादे दिवशी तालुक्यात मोठा घातपात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

कधी-कधी सिडको व पोलीस अधिकारी या भंगाराच्या दुकानांवर कारवाई करण्याचे नाटक करतात, मात्र त्यांची पाठ वळते न वळते तोच या भंगारवाल्यांची दुकाने पुन्हा जैसे थे स्थितीत सुरू असल्याने या मागचे गौडबंगाल काय आहे हे लोकांना कळून चुकले आहे. शासकीय जागेच्या व्यतिरिक्त अनेक गावात देखिल अशा प्रकारची दुकाने ठिकठिकाणी दिसून येतात. गावातील स्थानिक मंडळी भाड्यापोटी या व्यवसायिकांना आश्रय देत असल्याचे दिसून येत आहे. याबाबत गावागावात सायकलवर फिरून भंगार गोळा करणाऱ्या एका भंगारवाल्याला विचारले असता त्यांनी सांगितले की, आम्ही गोळा केलेला भंगार विकत घेणाऱ्या मुख्य मालकाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांशी हितसंबध असतात. त्यामुळे आमच्यावर काहीही कारवाई होऊ शकत नाही. तसेच गावातील तरुण व कामगार वर्ग हे आपआपल्या ठिकाणाहून माल चोरुन सदर भंगाराच्या गोदामात विक्रीसाठी घेऊन येतात. त्यांना त्या बदल्यात पैसे मिळतात. काही दिवसांपुर्वी उरणमधील काही तरुणांनी गाडीच्या बॅटऱ्या चोरुन विकल्याचे प्रकरण समोर आले होते. तरी स्थानिक तरुण कामगार अशा प्रकारच्या चोऱ्यांकडे वळण्या अगोदरच स्थानिक ग्रामपंचायत, लोकप्रतिनिधी व पोलीस यंत्रणेने खबरदारी म्हणून भंगार व्यवसायिकांवर कारवाईचा बडगा उगारणे गरजेचे आहे.

उरण तालुक्यात भंगार व्यवसायिकांनी आपले बस्तान बसवले आहे. त्यामुळे सर्वत्र घाणीचे साम्राज्य दिसून येत आहे. तसेच या भंगारात चोरीचा माल खरेदी केला जात असल्याने स्थानिक आदिवासी मुले तसेच इतर मुले पैशाच्या हव्यासापोटी रहिवाशांच्या घरांजवळील तसेच इतर वाहनांमधील माल चोरी करून आपआपल्या परिसरातील भंगार व्यवसायिकांना विकून नशेबरोबर आंबटशौकांकडे वळत आहेत. तरी अनधिकृत भंगार व्यवसायिकांवर कारवाई व्हावी.
-एम. चा. भोईर,
सामाजिक कार्यकर्ते

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!