रोह्यात चणेऱ्यातील स्कूलमधील धक्कादायक प्रकार
वार्ताहर
धाटाव : रोहा तालुक्यातील चणेरा येथील एका स्कूलमधून एक धक्कादायक वृत्त समोर आले आहे. येथील शिक्षक अनिल कुंभार याच्यावर शाळेत शिकणाऱ्या तब्बल ६ मुलींनी विनयभंग केल्याचा गंभीर आरोप केला आहे. या संदर्भात रोहा पोलीस ठाण्यात पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून शिक्षक अनिल कुंभार याला रोहा पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. हा धक्कादायक प्रकार घडल्याने स्थानिक नागरिक आणि पालकांमधून प्रचंड संताप व्यक्त होत आहे.
रोहा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना २४ मार्च रोजी सकाळी ८:३० ते ९ वाजण्याच्या दरम्यान घडली असून पीडित विद्यार्थिनी वर्गात शिकत असताना आरोपी शिक्षक अनिल कुंभार याने त्यांना त्यांच्या इच्छेविरुद्ध अयोग्यरित्या स्पर्श करून विनयभंग केल्याची तक्रार ६ विद्यार्थीनींनी केली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तातडीने कारवाई करून आरोपी अनिल कुंभार याला अटक केली आली आहे. या प्रकरणाचा रोह्याचे पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलीस सबइन्स्पेक्टर खतीब यांच्यासह सहकारी वर्ग तपास करीत आहेत.
दरम्यान या घटनेबाबत आरोपीविरुद्ध पुरेसे पुरावे गोळा केले जात असून, त्याआधारे लवकरच कायदेशीर पावले उचलली जातील असे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणात आरोपीवर POCSO कायद्याची कलमे लावण्यात आली आहेत. एकंदरीत ६ मुलींबाबत ही घृणास्पद घटना घडल्याने स्थानिक नागरिक आणि पालकांमधून प्रचंड संताप व्यक्त होत आहे.